लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी सिडकोतील प्रियदर्शनी उद्यानातील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मारकाचे काम चांगल्या गतीने सुरू असून, नियोजित १८ महिन्यांत पूर्ण केले जाईल, असे सांगितले.
खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीनंतर पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली. यावेळी पाण्डेय यांनी स्मारकाच्या विविध कामांची माहिती दिली. मनपातर्फे साडेदहा एकरमध्ये ४० प्लॉट करून त्यात ५,८२८ विविध देशी फळझाडांची लागवड करण्यात येणार आहे. डिझाईन फॅक्टरी ऑफ इंडिया या कंपनीकडून स्मारकाचे काम करण्यात येत आहे. सध्या खोदकाम, रस्ते तसेच सुशोभिकरणाचे काम सुरू असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी आमदार अंबादास दानवे, शहर अभियंता एस. डी. पानझडे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, आदी उपस्थित होते.