महाविकास आघाडीत सुप्त संघर्ष; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 02:55 PM2021-01-04T14:55:35+5:302021-01-04T14:59:12+5:30
Congress workers join Shiv Sena in Aurangabad : चिकलठाणा येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले माजी नगरसेवक सोहेल शेख यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी एकमेकांचे नेते कार्यकर्ते पळवून नेऊ नयेत असे संकेत असतानाही शनिवारी रात्री औरंगाबाद महापालिकेतील काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने शिवबंधन बांधले. काँग्रेसमधील आणखीन दोन नगरसेवक शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत. मात्र, त्यांना अद्याप ग्रीन सिग्नल मिळालेला नाही.
चिकलठाणा येथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले माजी नगरसेवक सोहेल शेख यांनी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र त्रिवेदी यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्याला परिसरातील नागरिकांनी आणि शिवसैनिकांनी गर्दी केली होती. या प्रवेश सोहळ्यानंतर काँग्रेसमध्ये उघड नाराजी व्यक्त होत आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा समावेश आहे. तिन्ही पक्षांनी मिळून किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. तिन्ही पक्षांतील वाद निवळण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केलेली आहे. जुलै २०२० मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावरून शिवसेनेने उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर अवघ्या चारच दिवसांमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी राष्ट्रवादीत गेलेल्या सर्व नगरसेवकांना मातोश्रीवर आणून वादाला पूर्णविराम दिला होता.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे आ. अब्दुल सत्तार यांनी शिवबंधन बांधले. शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर सत्तार यांना राज्यमंत्रीपद मिळाले. सत्तार यांचे समर्थक नगरसेवक शिवसेनेत गेले नाहीत. शनिवारी रात्री अचानक चिकलठाणा येथे माजी नगरसेवक सोहेल शेख यांचा प्रवेशसोहळा झाला. सोहेल यांच्यापाठोपाठ समतानगर वॉर्डातील काँग्रेसच्या नगरसेविका शबनम कुरेशी आणि त्यांचे पती अशपाक कुरेशी, लेबर कॉलनी येथून निवडून आलेले माजी नगरसेवक आयुब खान हेसुद्धा शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी नमूद केले. अशपाक कुरेशी यांनी लोकमतशी बोलताना नमूद केले की, अद्याप शिवबंधन बांधण्याचे निश्चित झालेले नाही.
शिवसेनेकडून संकेताचे उल्लंघन
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन मोठे पक्ष सहभागी झालेले आहेत. तिन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते किंवा नेते फोडू नयेत असे संकेत आहेत. शनिवारी रात्री काँग्रेसचे नगरसेवक सोहेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यासंदर्भात वरिष्ठांच्या कानावर हकिकत घालण्यात येईल.
- डॉ. कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस
सोहेल विधानसभेपासून शिवसेनेसोबत
अब्दुल सत्तार यांनी जेव्हा विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा नगरसेवक सोहेल शेख महापालिकेत नगरसेवक होते. पक्षांतर बंदी कायद्यामुळे त्यांचे पद गेले असते. त्यांनी विधानसभेपासून आजपर्यंत शिवसेनेचे मन लावून काम करणे सुरू केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना शनिवारी पक्षात प्रवेश दिला. आणखीन दोन नगरसेवक सेनेच्या वाटेवर असल्याची आपल्याला कल्पना नाही.
- नरेंद्र त्रिवेदी, जिल्हाप्रमुख, शिवसेना