लातूर : मुंबई-लातूर एक्सप्रेस बचाव कृती समितीच्या वतीने लातूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे़५ मे रोजी शहरातील आडत बाजारासह दुकाने, आस्थापने, शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत़ बंद यशस्वी करण्यासाठी कृती समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक गुरूवारी स्काऊट गाईडच्या कार्यालयात झाली़ या बैठकीला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ मुंबई-लातूर एक्सप्रेस बीदरपर्यंत वाढविल्याने लातूर व उस्मानाबाद परिसरातील प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत़ या रेल्वेचा विस्तार बीदरपर्यंत झाल्यामुळे लातूर व उस्मानाबादच्या प्रवाशांना रेल्वेत पाय ठेवायलाही जागा मिळत नाही, असे असताना जनरल डब्बे कमी करण्यात आले आहेत़ त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत़ प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी विस्तारीकरण रद्द करण्यात यावे व उदगीरच्या प्रवाशांची सोय व्हावी म्हणून स्वतंत्र रेल्वे सोडण्यात यावी, या मागणीसाठी लातूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे़ या बंदला लातूर शहरातील हजारो नागरिकांनी सह्या देवून पाठिंबा दर्शविला आहे़ दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीत पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे़ ५ मे रोजी लातूर बंद केल्यानंतर ९ मे रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे़ लातूरकरांचा उदगीरपर्यंत रेल्वे जाण्यास विरोध नाही़ हवेतर या मार्गावर आगाऊ रेल्वे चालू करावी, अशीही मागणी होत आहे़ पण, लातूर एक्सप्रेसचा विस्तार करू नये ही मागणी जोर धरत आहे़
रेल्वेसाठी आज लातूर बंद
By admin | Published: May 04, 2017 11:27 PM