सिल्लोड : तालुक्यातील शिवना येथील बाजारपेठेत बुधवारी रात्री ९:३० वाजता गणपती उत्सवानिमित्त सुरू असलेल्या ‘गौरव महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात लावण्यांच्या कार्यक्रमात ‘लावण्या लावून बाया नाचवता का?’ असे म्हणून गोंधळ घालून कार्यक्रम बंद केल्याप्रकरणी ३९ जणांविरुद्ध अजिंठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्पनेतून सिल्लोड गणेश महासंघाच्या वतीने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. शिवना येथेही ‘गौरव महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लावणी सुरू असताना बुधवारी रात्री ९:३० वाजता, “लावण्या लावून बाया नाचवता का?” असा सवाल करून भाजपचे नेते अरुण काळे व इतर ३८ जणांनी या कार्यक्रमावर आक्षेप घेतला. त्यानंतर बाजूला असलेल्या गणपती मंडळाजवळील स्पीकरचा आवाज मोठा करून गाणे वाजवले व लावण्यांचा कार्यक्रम बंद पाडला. तसेच असभ्य अशा घोषणा दिल्या. याबाबत विठ्ठल सपकाळ हे समजावून सांगण्यास गेले असता त्यांना धक्काबुक्की करून बॅनर फाडण्यात आले.
याबाबत राजेंद्र उत्तमराव काळे यांच्या फिर्यादीवरून अजिंठा पोलिस ठाण्यात भाजपचे बाजार समितीचे माजी उपसभापती अरुण तेजराव काळे, अनिल सुरेश काळे, अमोल रामधन काळे, आकाश गुप्ता, गौरव मधुकर दांडगे, योगेश रघुनाथ सपकाळ, शुभम काळे, समाधान काटे, अनिल बाबूराव काळे, कुंदन श्रीधर काळे, विनोद गणपत बावस्कर, संदीप गणपत बावस्कर, सतीश गणपत काळे व इतर अशा एकूण ३९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. निवडणूक जवळ आल्याने भाजप - सेना कार्यकर्त्यांमध्ये असे वाद होताना दिसत आहेत.