औरंगाबाद : लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेला २० वर्षे लागले. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंदीकरण करून दिले. या रस्त्याच्या कामासाठी महापालिकेला तब्बल ७ वर्षे लागले. १४ कोटी रुपये खर्च करून सिमेंट रस्ता तयार करण्याची निविदा आयुक्तांकडे मंजुरीस्तव ठेवली आहे. त्यानंतर स्थायी समितीची मंजुरी मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
जालना रोडला पर्यायी रस्ता म्हणून लक्ष्मण चावडी ते एमजीएमकडे बघितले जाते. महावीर चौक ते सिडको बसस्थानकाकडे जाणार्या वाहनधारकांना जालना रोडवरून ये-जा करायची नसेल, तर वरद गणेश मंदिर ते थेट एमजीएमपर्यंत येता येईल. हा रस्ता अनेक वर्षे रुंदीकरणामुळे रखडला होता. अनेक महापौरांनी, आयुक्तांनी रुंदीकरणासाठी जंगजंग पछाडले; पण रुंदीकरण झाले नव्हते. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंद करून दिला. काही मालमत्ताधारकांनी रुंदीकरणात जागा गेली पण मोबदला मिळाला नाही, म्हणून न्यायालयात धाव घेतली. मनपा अधिकार्यांना एवढेच निमित्त सापडले. मागील ७ वर्षांमध्ये नागरिकांसोबत कोणतीही वाटाघाटी न करता प्रश्न तसाच प्रलंबित ठेवला.
२ जानेवारी २०१७ रोजी तत्कालीन महापौर बापू घडमोडे यांनी वादग्रस्त मालमत्ता सोडून रस्त्याचे काम सुरू करावे, असे निर्देश दिले, बापू यांच्या घोषणेला वर्ष उलटले तरी मनपा प्रशासनाने काम सुरू केले नाही. शेवटी आयुक्त डी.एम. मुगळीकर, महापौर नंदकुमार घोडेले, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा यांनी जोरदार प्रयत्न केल्यानंतर महापालिकेने १४ कोटी रुपयांची निविदा काढली. ए.एस. कन्स्ट्रक्शनने ५ टक्के कमी दराने निविदा दाखल केली. निविदा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आल्याची माहिती महापौरांनी दिली. यानंतर स्थायीच्या मंजुरीनंतर वर्कआॅर्डर देण्यात येईल. जानेवारी २०१८ मध्ये या रस्त्याचे काम शंभर टक्के सुरू होणार, असे आश्वासन त्यांनी दिले.
जालना रोडचा ताण कमी होणारजालना रोडवर २४ तासांत साडेपाच लाखांहून अधिक वाहने ये-जा करतात. वाहनधारकांना पर्यायी रस्ताच नसल्याने अनेकदा वाहतूक कोंडी, सिग्नलमध्ये अडकून पडावे लागते. लक्ष्मण चावडी ते एमजीएम हा सिमेंट रस्ता तयार झाल्यावर अनेक वाहनधारक याच रस्त्याचा वापर करतील. जालना रोडवरील वाहतुकीचा ताण पन्नास टक्के कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.