औरंगाबाद : मराठवाड्याचे भूमिपुत्र व निवृत्त सनदी अधिकारी साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी औरंगाबाद येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या सभागृहात अर्ज दाखल केला. दादा गोरे आणि आसाराम लोमटे यांनी महामंडळातर्फे त्यांचा अर्ज स्वीकारला.
देशमुख यांच्या अर्जावर गंगाधर पानतावणे सूचक असून, डॉ. छाया महाजन, डॉ. ऋषिकेश कांबळे, उत्तम बावस्कर, डॉ. कैलास अंभुरे आणि डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी अनुमोदन दिले. देशमुख यांनी सर्व प्रथम पुण्यातून आणि त्यानंतर बडोदा येथून अर्ज दाखल केलेला आहे. संमेलनस्थळाच्या रस्सीखेचानंतर अखेर ९१ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे होत आहे. तत्पूर्वी महामंडळाने बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रमाला संमेलनाचे यजमानपद बहाल केले होते. यावरून बरेच वादंग उठले. अखेर या वादाच्या पार्श्वभूमीवर आश्रमाने संमेलन घेण्यास नकार दिला व तो बहुमान बडोद्याला मिळाला.
लक्ष्मीकांत देशमुख हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम या गावचे. नांदेड येथे त्यांचे दीर्घकाळ वास्तव्य राहिले आहे. आजवरच्या कारकीर्दीमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी व महसूल विभागात अधिकारी म्हणून काम केलेले आहे. प्रशासकीय जीवनातील येणारे अनुभव, समाजातील ज्वलंत प्रश्न, भ्रष्टाचार आदी विषयांवर त्यांनी कथा-कादंब-या लिहिल्या. गावपातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कादंबºया त्यांनी लिहिल्या. त्यामुळे ते स्वत:ला ‘ग्लोकल’ म्हणजेच ग्लोबल आणि लोकल लेखक मानतात. यापूर्वी ते ३८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.