उस्मानाबाद : बँक ग्राहकाला एटीएम बंद पडल्याचे सांगत फोनवरून एटीएम नंबर व पासवर्ड घेऊन त्याच्या खात्यावरील तब्बल २ लाख १० हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले़ ही घटना २८ फेब्रुवारी ते २ मार्च या कालावधीत घडली. या प्रकरणी शहर पोलीस गुन्हा नोंद झाला आहे.शहरातील साठेनगर भागात राहणारे अशोक शंकर पांचाळ यांचे शहरातील बालाजीनगर भागात फर्निचरचे दुकान होते़ अशोक पांचाळ यांनी हे दुकान चालत नसल्याने त्याची विक्री केली़ त्यावेळी त्यांना रोख ५० हजार रूपये व दोन लाख रूपयांचा चेक मिळाला होता़ ही रक्कम त्यांनी त्यांच्या युनियन बँकेतील खात्यावर जमा केली होती़ याच काळात पांचाळ यांना पॉलिसीचे २९ हजार रूपये मिळाले होते़ त्यांनी हे पैसेही खात्यावर जमा केले होते़ त्यानंतर गरज पडल्याने त्यांनी ४९ हजार रूपये खात्यावरून काढले होते़ २८ फेब्रुवारी रोजी त्यांना एका नंबरवरून फोन आला होता़ बँकेचा तीन दिवस संप असून, तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे़ कार्डवरील पाठीमागील व समोरील क्रमांकांची फोनवर विचारणा करण्यात आली़ पांचाळ यांनी नंबर सांगितल्यानंतर त्यांचा पासवर्ड बदलून त्यांना सांगण्यात आला़ त्यानंतर पांचाळ यांनी खात्यावरून एक हजार रूपये काढले होते़ पांचाळ यांनी पुन्हा खात्यावरून रक्कम काढली नव्हती़ पासबूक प्रिंट करण्यासाठी ते बँकेत गेल्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे त्यांना पुन्हा येण्यास सांगण्यात आले़ तर ७ मार्च रोजी त्यांनी पासबूक प्रिंट केल्यानंतर त्यांच्या खात्यावरून तब्बल २ लाख १० हजार रूपये काढण्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले़ आपली फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात येताच अशोक पांचाळ यांनी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली़ या फिर्यादीवरून अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन लाख केले खात्यावरून लंपास
By admin | Published: March 10, 2017 12:29 AM