औरंगाबाद : बिडकीन येथे ५१७ एकर जागेवर फूड पार्क उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जानेवारी महिन्यात केली होती. त्यानुसार ऑरिक सिटी प्रशासनाने फूड पार्कच्या कामाचा आराखडा तयार करून जागा विकसित करण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी हे फूड पार्क उत्तम पर्याय ठरेल, अशी अपेक्षा उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी व्यक्त केली. जानेवारी २०२१ पर्यंत पार्कचे लोकार्पण करण्याचा दावा करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात फूड पार्कच्या कामाबाबत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी उदय चौधरी, यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सिंंगद्वारे राज्याचे उद्योग सचिव वेणुगोपाल रेड्डी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगण, एमआयडीसीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी, तथा आॅरिकचे व्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, आॅरिकचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय काटकर आदींची उपस्थिती होती.
देसाई म्हणाले, फूड पार्कची उभारणी चांगली झाली पाहिजे. औरंगाबाद हा कृषिप्रधान जिल्हा असून शेतकरी कापूस, मका, सोयाबीन, डाळिंब, शेवगा यासह विविध फळपिके, भाज्या यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. यासोबतच या ठिकाणी तुती लागवड मोठ्या प्रमाणात होते. मात्र, त्यातील रेशीम कोषातून धागा तयार करण्यासाठी कोष बंगळुरू येथे पाठवावे लागतात. या सर्व पार्श्वभूमीवर बिडकीन फूड पार्कमध्ये शेतक-यांना, बचतगटांना, नवउद्योजकांना अन्नधान्य प्रकियांचे उद्योग करण्यासाठीच्या सुविधा उपलब्ध होणे शक्य आहे.
जानेवारी २०२१ अखेरपर्यंत पार्क सुरू होईल५१७ एकर जागेवर फूड पार्क उभारले जाणार असून, यापैकी ६० एकर जागा ही विकसित आहे. ४५७ एकर जागेचा आराखडा तयार करावा लागणार आहे. त्याचे प्लॅनिंग, आराखडा उद्योगमंत्री देसाई यांना सादर करण्यात आला. जानेवारी २०२१ अखेरीस या फूड पार्कचे लोकार्पण करण्यात येईल, असा विश्वास डॉ. अनबलगण यांनी व्यक्त केला. फूड पार्कच्या आराखड्याबाबत संचालक जाधव यांनी माहिती दिली.