भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या मिलिंद कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आणि दलित साहित्याच्या संवर्धनात ६० च्या दशकात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या इच्छेनुसार कुठलेही विधी न करता केवळ सामूहिक बुद्धवंदना घेऊन त्यांचा मृतदेह औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
मराठीचे प्राध्यापक म्हणून १९६३ ला मिलिंद महाविद्यालयात रुजू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यक्त होता यावे यासाठी त्यांनी भित्तीपत्रक सुरू केले. मिलिंदच्या संस्कारांतून घडलेल्या विद्यार्थ्यांचे जीवघेणे अनुभव या हस्तलिखित पाक्षिकातून व्यक्त व्हायला लागले. या नव्या अभिव्यक्तीची राज्य पातळीवर नोंद घेण्यात आली. त्यातूनच पुढे दलित साहित्याची चळवळ उदयाला आली. यात डाॅ. म.ना. वानखडे, प्राचार्य म.भि. चिटणीस, प्रा. रा.ग. जाधव इत्यादींसोबत प्रा. रायमाने यांचाही महत्त्वपूर्ण सहभाग होता.
दलित साहित्य चळवळीतील अग्रणी ठरलेले अस्मिता, मिलिंद साहित्य परिषदेतही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. बाबासाहेबांचे सहकारी बा.ह. वराळे यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.
मिलिंदमध्ये राज्यभरातून अतिशय बिकट अवस्थेतून दलित विद्यार्थी येत. प्रा. रायमाने यांनी आईच्या ममतेने या मुलांच्या अडचणी समजावून घेतल्या. त्यांना आयुष्यात उभे राहण्यासाठी सर्व प्रकारची मदत केली.