लातूर : राज्य शासनाने महानगरपालिकांच्या क्षेत्रात लागू केलेल्या एलबीटीला व्यापार्यांनी जोरदार विरोध केला आहे. तरीही या प्रश्नात राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्यामुळे काँग्रेसला राज्यभरात पराभवाला सामोरे जावे लागले, असा दावा फेडरेशन असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे प्रवक्ते तथा व्यापारी महासंघाचे सचिव दिनेश गिल्डा यांनी केला आहे. राज्यातील विविध महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाने व्यापारी व नागरिक दोघांनाही जाचक ठरणारी एलबीटी कर प्रणाली लागू केली आहे. या कर प्रणालीस व्यापार्यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे. एलबीटी कायमस्वरूपी रद्द करावी, ही मागणी घेऊन व्यापारी संघटना राज्य शासनासोबत सातत्याने लढा देत आहेत. अनेकदा मुख्यमंत्री तसेच शासनाच्या प्रतिनिधींसमवेत चर्चेच्या बैठकाही झाल्या. मात्र या प्रश्नाकडे राज्य शासनाने हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे व्यापारीवर्गात राज्य शासनाबद्दल नाराजीचा सूर आहे, असे दिनेश गिल्डा यांनी सांगितले. एलबीटी रद्द करण्यासाठी व्यापारी संघटनांनी सनदशीर मार्गाने आंदोलने केली. लोकसभेपूर्वी यावर निर्णय न झाल्यास व्यापारी सरकारविरोधी पवित्रा घेतील, असा इशाराही दिला होता. त्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच नाराज असलेल्या व्यापार्यांनी आघाडी विरोधात काम केले. त्यामुळेच एलबीटी लागू असलेल्या नांंदेड वगळता अन्य महानगरपालिका क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना पराभवाचे तोंड पहावे लागले असल्याचा दावाही व्यापारी महासंघाचे सचिव दिनेश गिल्डा यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
एलबीटीमुळे पराभव; व्यापार्यांचा दावा
By admin | Published: May 20, 2014 12:21 AM