वाळूज महानगर : पाटोदा-वाल्मी रस्त्यावर एमआयडीसीच्या मुख्य जलवाहनीला गळती सुरु आहे. मात्र सोमवारी (दि.१८) पाण्याचा दाब वाढल्याने मोठ्या प्रमाणात पाणी खाली वाहून गेले. अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे नाहक पाण्याचा अपव्यय होत असल्याने सुजान नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
वाळूज उद्योगनगरीसह परिसरातील अनेक नागरी वसाहतीला एमआयडीसी पाणीपुरवठा करते. पाणीपुरवठ्यासाठी एमआयडीसीने पैठण येथून वाल्मी, पाटोदा मार्गे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहनी टाकली आहे. या जलवाहीनीला पाटोदा गावाजवळ बºयाच ठिकाणी मागील काही दिवसांपासून गळती सुरु आहे. प्रशासनाच्या निदर्शनास आनून देवूनही या गळतीची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे दररोज या रस्त्यावर गळतीच्या माध्यमातनू पाण्याची नासाडी होत आहे. रविवारी सकाळी पाण्याचा दाब वाढल्याने गळतीचे प्रमाण वाढले होते.
पाटोदा पुलाजवळ जलवाहीनीतून पाण्याचे कारंजे उडत असल्याने पाणी रस्त्यावरुन वाहत होते. गळतीमुळे जलकुंभात पुरेसा पाणीसाठी होत नाही. त्यामुळे बजाजनगरसह सिडको वाळूज महानगर, रांजणगाव, पंढरपूर, वडगाव, जोगेश्वरी आदी गावाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असून नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एकीकडे परिसरातील अनेक गावात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे एमआयडीसीच्या दुर्लक्षित कारभारामुळे पाणी वाया जात असल्याने सुज्ञ नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.