छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आ.अंबादास दानवे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी रविवारी येथे एका कार्यक्रमात केला. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या एका दौरा दरम्यान त्यांची राहण्याची व्यवस्था सुभेदारी विश्रामगृहाऐवजी ऐनवेळी पंचतारांकित रामा हॉटेलमध्ये करावी लागल्याचा किस्सा दानवेंनी सांगितल्याचा दावा शिरसाट यांनी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या धनुष्याण यात्रेची पूर्वतयारीनिमित्त शिंदेगट शिवसेनेचा मेळावा रविवारी संत एकनाथ रंगमंदीरात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना आ.शिरसाट यांनी विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे हे त्यांच्या (शिंदे गटाच्या) संपर्कात असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट केला. शिरसाट म्हणाले की, शिवसेनेत नव्याने आलेल्या उपनेत्या अंधारे या आम्हा सर्वांना माझे भाऊ, माझे भाऊ म्हणते. आमची ३८ वर्ष शिवसेनेत गेली, आम्हाला शिकवणारे तुम्ही आहे तरी कोण असा प्रश्न उपस्थित केला.
अंधारे यांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्याचा किस्सा दानवे यांनी आपल्याला सांगितल्याचे शिरसाट म्हणाले. शिवसेनेची उभारणी करताना मुंबईहून नेते यायचे मात्र ते शंभर रुपये किराया असलेल्या हॉटेलमध्ये राहायचे आणि ग्रामीण भागात साधे चहा, पोहे खात होते. मात्र अंधारे यांनी छत्रपती संभाजीनगरच्या एका दौऱ्यावर असताना आ.दानवे यांनी त्यांची राहण्याची व्यवस्था सुभेदारी विश्रामगृहात केली होती. मात्र याचा राग अंधारे यांना आला आणि त्यांनी मातोश्रीवर वहिनींना फोन केला. यामुळे शेवटी त्यांची राहण्याची व्यवस्था पंचतारांकित रामा हॉटेलमध्ये करावी लागल्याचा किस्सा दानवेंनी सांगितल्याचे शिरसाट यांनी सांगितले. शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटाचे नेते एकापाठोपाठ शिंदे गटात जात आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे सहा पैकी पाच आमदार शिंदेगटात आहेत. आज राज्याच्या विधान परिषदेचे विरोधीपक्षेनते आ. अंबादास दानवे हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा खुलासा आ. शिरसाट यांनी केल्याने खळबळ उडाली.
दानवे यांची प्रतिक्रियास्वप्न पहा, शिरसाट यांची बडबड कोणी ऐकत नाही. आमदार संजय शिरसाट यांची बडबड आजकाल कोणीही ऐकत नाही. ते बडबड करीत असतात.त्यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. मी शिंदे गटात यावे,असे त्यांचे स्वप्न असेल तर ते त्यांनी पहावे. - आ. अंबादास दानवे, विधानपरिषद विरोधीपक्षनेते