बीड : खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसात 'सेल्फी विथ खड्डे' ही जोरदार मोहीम उघडली आहे. याद्वारे त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधत राज्यातील खड्ड्यांचे वास्तव चव्हाटयावर आणले. आता या मोहिमेत विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा उडी घेतली असून त्यांनी बीड येथे काल अंबाजोगाई ते अहमदपूर राज्य रस्ता क्र.156 खड्ड्यांसोबत सेल्फी काढून ते फोटो ट्विटरवर मंत्री पाटील यांना पाठवले आहेत.
राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा विषय चव्हाट्यावर आणत खासदार सुप्रिया सुळे यांनी खड्डयांसोबत आपले फोटो काढून ते ट्विटरच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवण्याची मोहीम उघडली आहे. या मोहिमेमुळे अडचणीत आलेल्या पाटील यांनी यावर नुकतेच राज्यातील रस्त्यांवरील खड्डे 15 डिसेंबरपर्यंत बुजविण्याचे आश्वासन दिले. खासदार सुळे
यांचे हे फोटो शूट गाजत असताना आता विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेयांनी या सेल्फी मोहोमेत सहभाग घेतला आहे. त्यांनी गुरुवारी अंबेजोगाई ते अहमदपूर या रस्त्यावरून उदगिरकडे जात असताना खड्डयांसोबत सेल्फी काढून त्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटरद्वारे पाठवल्या आहेत.
खड्याच्या कामावर राष्ट्रवादीचे लक्ष बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी 15 डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांवरील सर्व खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले. मात्र, हि खड्डे बुजवत असताना ब-याच ठिकाणी खड्यात केवळ माती व मुरूम टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. याच्यावरही राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्ष असून त्यावर आंदोलन करण्यात येईल असे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
पुन्हा १६ डिसेंबरला फोटो काढू
दरम्यान आपण केवळ एका रस्त्याचा फोटो बांधकाम मंत्री यांना पाठवला आहे, हा केवळ एका रस्त्याचा प्रश्न नसून संपूर्ण राज्यातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. चंद्रकांत दादा यांनी 15डिसेंबर पर्यंत खड्डे बुजवण्याची घोषणा केली आहे आम्ही त्यांना 15 डिसेंबर ची मुदत देत असून या कालावधीत खड्डे न बुजल्यास दादांना घेऊन जाऊन त्यांना त्या वेळी सेल्फी नाही तर प्रत्यक्ष खड्डा दाखवू असे आव्हान मुंडे यांनी दिले.