औरंगाबाद : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कुटुंबशाही आहे. त्यामुळे या पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी बहुजन वंचित आघाडीत यावे. त्यांना योग्य सन्मान, पदे, उमेदवारीही देण्यात येईल. कुटुंबशाहीतून मुक्त होण्याची ही संधी असल्याचे मत बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केले.
बीड बायपास रोडवरील जबिंदा लॉन येथे शुक्रवारी रात्री वंचित आघाडीचे उमेदवार आ. इम्तियाज जलील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एमआयएम पक्षप्रमुख खा. असदोद्दीन ओवेसी, आ. इम्तियाज जलील, आ. वारीस पठाण यांच्यासह स्थानिक नेते, कार्यकर्ते, नगरसेवक उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले की, आम्ही ४८ जागा का लढविल्या, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ईव्हीएम मशीन जेव्हा उघडतील तेव्हा बघा... आज अंदाज लावणे कोणालाही सोपे जात नाही. ज्या उमेदवाराच्या जातीची मतेच नाहीत, त्यांनाही आम्ही उमेदवारी दिली. जात पाहून उमेदवारी देण्याचा फंडा ‘वंचित’मध्ये नाही. ‘वंचित’कडे पैसा आला कोठून, असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. जनता जनार्दन मत, पैसा देऊन सभांना गर्दी करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. एमआयएमच्या जिल्हाध्यक्ष पदावरून काढण्यात आलेले जावेद कुरैशी यांना आज पुन्हा पक्षात स्थान देण्यात आले.
साध्वी प्रज्ञा ठाकूरवर डागली तोफखा. असदोद्दीन ओवेसी यांनी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर तोफ डागली. दहशतवादाच्या विरोधात मोदी लढत असलेली लढाई नाट्य असल्याचा आरोप त्यांनी केला. शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वीने केलेल्या आरोपांचाही खरपूस समाचार घेतला. शहीद करकरे यांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर ७२ तासांची बंदी निवडणूक आयोगाने घातली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा बाबरच्या मुलांना मत देऊ नका, असे आवाहन केले. यावरही ओवेसींनी तोफ डागली.