अनुराग पोवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांची संख्या मोठी असून त्यांच्या विजयासाठी नेत्यांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. महापालिका निवडणुकीत भाजपा नेत्यांचे कुटुंबिय सर्वाधिक आहेत तर काँग्रेस नेत्यांच्या कुटुंबियांचीही प्रतिष्ठा काही ठिकाणी पणाला लागली आहे.नवीन नांदेडात प्रभाग १९ वसरणीमध्ये भाजपाच्या व्यापारी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांचे चिरंजीव कुणाल कंदकुर्ते पहिल्यांदाच मनपा निवडणुकीत त्यांना काँग्रेसच्या राजीव काळे, शिवसेनेचे सुहास खराणे यांच्याशी सामना करावा लागणार आहे. अपक्ष उमेदवार अवतारसिंघ सोडी हेही मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.काँग्रेसचे आ. वसंत चव्हाण यांचे बंधू आनंद चव्हाण हेही पुन्हा एकदा हनुमानगड प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. प्रभाग रचनेमुळे दोन वॉर्ड जोडल्यामुळे नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची कसरत करावी लागत आहे. भाजपाचे सुभाष मंगनाळे, एमआयएमचे मो. वसीयोद्दीन तसेच अपक्ष शंकरसिंघ गाडीवाले हे तगडे उमेदवार त्यांच्या विरोधात आहेत.भाजपाचे उपाध्यक्ष प्रवीण साले यांच्या पत्नी अरुंधती पुरंदरे या भाग्यनगर प्रभागातून रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना काँग्रेसच्या अपर्णा नेरलकर यांचे आव्हान आहे. त्याचसोबत एमआयएमच्या सईदा खान, समाजवादी पार्टीच्या सय्यद सुलेखा याही रिंगणात असल्या तरी काँग्रेस-भाजपामध्येच या वॉर्डात लढत होत आहे. माजी महापौर सुधाकर पांढरे यांची कन्या स्नेहा पांढरे याही पुन्हा एकदा भाग्यनगर प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेसकडून जयश्री पावडे पुन्हा एकदा महापालिकेत येण्याचा प्रयत्न या वॉर्डात करीत आहेत. या वॉर्डातही पांढरे आणि पावडे यांच्यातच खरी लढत होणार आहे.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी वैशाली देशमुख या गणेशनगर प्रभागातून पुन्हा एकदा मनपा निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने कल्पना बाळासाहेब देशमुख यांना रिंगणात आणले आहे. सेनेच्या साधना माधव पावडे आणि शोभा बाबूराव भोकरे यांचेही काही अंशी आव्हान राहणार आहे. भाजपाचे प्रदेश प्रवक्ते सुनील नेरलकर यांचे पुतणे आशिष नेरलकर गणेशनगर भागातून काँग्रेसचे महेश कनकदंडे यांचा सामना करीत आहेत. एमआयएमचे जावेद खान, शिवसेनेचे उमेश डिगे यांनीही निवडणुकीत आपला प्रचार सुरू केला आहे.बहुजन विकास आघाडीचे नेते सुरेश गायकवाड यांच्या पत्नी अंजली गायकवाड या श्रावस्तीनगर प्रभागातून निवडणूक लढवित आहेत. दुसºयांदा निवडणूक लढविणाºया अंजली गायकवाड यांना काँग्रेसच्या ज्योती रायबोले यांच्याशी लढत द्यावी लागत आहे. शिवसेनेने बबिता भदरगे, बसपाने अरुणाबाई डाकोरे, राष्ट्रवादी काँग्रेसने पंचशीला क्षीरसागर आणि भारिपने शोभाबाई सोनकांबळे यांना उतरवले आहे. या वॉर्डातही काँग्रेस व भाजपात थेट सामना होणार आहे.एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्या मातोश्री होळी प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना काँग्रेसच्या शबाना बेगम मो. नासेर यांचे आव्हान आहे. शिवसेनेच्या मनोरमा वट्टमवार, राकाँच्या सावित्रीबाई मामीडवार, भाजपाच्या मीना पत्की आणि समाजवादीच्या बिसमिल्ला बेगम हे रिंगणात आहेत. या प्रभागात एमआयएम आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत होत आहे.भाजपाच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष दिलीपसिंग सोडी यांच्या पत्नी गुरप्रीत कौर सोडी या पुन्हा एकदा गाडीपुरा प्रभागातून निवडणूक लढवत आहेत. येथे काँग्रेसच्या निखत परवीन, शिवसेनेच्या मनीषा देशमुख, राष्ट्रवादीच्या फरजाना बेगम, एमआयएमच्या अब्दुल फरहाना या अन्य प्रमुख उमेदवार आहेत. मनप्रीत कौर गाडीवाले या काँग्रेसच्या तिकिटावर नवा मोंढा प्रभागात नशीब आजमावत आहेत. त्यांचा भाजपाच्या मंदाकिनी आनंद पाटील शिवसेनेच्या कमलबाई शिंदे, अ.भा. सेनेच्या ताराबाई गायकवाड, जनता दलाच्या ललिता जल्लेवाड आणि एका अपक्ष उमेदवाराशी सामना आहे.
कुटुंबियांच्या विजयासाठी नेत्यांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 12:43 AM