छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीनिमित्त सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी विजयाची गुढी उभारण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, या राजकीय गदारोळात शहरातील १८ लाखांहून अधिक नागरिकांची तहान कोण भागविणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी शहराला एक दिवसाआड पाणी मिळावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च केले, तरीही त्यांचा काहीच उपयोग झालेला नाही. आजही विविध वसाहतींना आठ ते दहा दिवसांतून एकदाच पाणी मिळत आहे.
दोन वर्षांपूर्वी राज्य, केंद्र शासनाने २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला मंजूरी दिली. त्यानंतर शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी मोठ-मोठे होर्डिंग लावले. आपल्या नेत्याला ‘जलसम्राट’ अशी पदवीही देऊन टाकली. स्मार्ट सिटी कार्यालयात वारंवार पाण्यासाठी बैठका घेतल्या. प्रत्येक बैठकीत एकच आग्रह होता, लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरात मुबलक प्रमाणात पाणी आले पाहिजे. राजकीय नेत्यांच्या दबावातून मनपा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी देखील २० फेब्रुवारीपासून शहरात ७५ एमएलडी मुबलक पाणी येईल, शहरला एक किंवा दोन दिवसांड पाणी देण्याची घोषणाही केली. प्रत्यक्षात एप्रिलचा पहिला आठवडा उलटला तरी पाण्यासाठी शिमगा सुरूच आहे. ऐन पाडव्याच्या दिवशीही मनपा शहराला पाणी देऊ शकली नाही, हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
२०० कोटी खर्च केले तरी...यंदाच्या उन्हाळ्यात शहराला पाणीटंचाई जाणवू नये म्हणून युद्धपातळीवर २०० कोटी रुपयांची जलवाहिनी जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात आली. ७५ एमएलडी पाणी या जलवाहिनीतून मिळेल असे घोषित केले होते. आज प्रत्यक्षात ८ ते १० एमएलडी पाणी जलवाहिनीतून घेण्यात येत आहे. कारण काय तर फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात वाढीव पाणी शुद्ध करण्याची क्षमता नाही. येथे आणखी एक जलशुद्धीकरण केंद्र उभारले जात आहे, त्याचे काम म्हणे जूनमध्ये पूर्ण होईल.
शहराची गरज अन् वस्तुस्थिती७०० आणि १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे सध्या शहराला दररोज ११५ ते १२० एमएलडी पाणी येत आहे. आठ ते दहा दिवसांतून एकदा विविध वसाहतींना अत्यल्प पाणीपुरवठा केला जातोय. शहराला दररोज २३० एमएलडी पाण्याची गरज आहे. एवढे पाणी आले तरच एक दिवसाआड शहराला पाणी मिळेल.
हर्सूल येथे ४ कोटींचा खर्चयंदा उन्हाळ्यात हर्सूल तलावातून जास्त पाणी उपसा करून जुन्या शहराला पाणी देण्यासाठी ४ कोटी रुपये खर्च करून नवीन जलशुद्धीकरण केंद्रही उभारले. या केंद्राची चाचणी घेण्याची वेळ आठ दिवसांपूर्वी आली तेव्हा तलावात मुबलक पाणीच नसल्याचे लक्षात आले. हा चार कोटींचा खर्चही पाण्यात गेल्यासारखी स्थिती आज तरी आहे.
नवीन योजना २०२५ मध्ये२७४० कोटी रुपये खर्च करून नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झाले. योजना पूर्ण होऊन शहरात पाणी येण्यासाठी किमान मार्च २०२५ तरी उजडेल असे वाटत आहे. ही योजना पूर्ण झाल्यावर शहराला तूर्त २५० एमएलडी पाणी येईल.
अडचण काय हे विचारूयंदा उन्हाळ्यात शहराला त्रास होऊ नये म्हणून ९०० मिमीची जलवाहिनी टाकली. ७५ एमएलडी पाणी यातून येणे अपेक्षित आहे. नेमके पाणी वाढवून का येत नाही, हे अधिकाऱ्यांना विचारले जाईल.- अतुल सावे, गृहनिर्माणमंत्री, भाजप.