औरंगाबाद : विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक व समाज या चारही घटकांना सोबत घेऊन गेल्या दोन वर्षांत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यापीठाला पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आगामी काळात सर्वांच्या सहकार्यातून विद्यापीठाची प्रतिमा व नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ते वर्ग अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कुलगुरू डॉ. येवले यांचा अधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या या विद्यापीठाला ऐतिहासिक परंपरा आहे. समाजाची फार मोठी अपेक्षा असणारी विद्यापीठ ही संस्था असते. तेथे कायद्यानेच निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे, अशी आम्हा सर्वांची प्रामाणिक भावना आहे. शेतकरी, कष्टकरी, बहुजन व अल्पसंख्याक समाजातील मुले मोठ्या संख्येने विद्यापीठात शिक्षणासाठी येतात. अनेक जण तर पहिल्या पिढीचे पदवीधर आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थी प्रचंड मेहनती व गुणवंत असून त्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते उत्तम कामगिरी करू शकतात. ‘कोविड’नंतरची बदलेली परिस्थिती लक्षात घेऊन बदल केले जातील. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. गिरीश काळे, ईश्वर मंझा, दिलीप भरड, किशोर नाडे आदींनी भावना व्यक्त केल्या. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले व संजय शिंदे यांनी आभार मानले.
चौकट...........................
संस्थेचे संस्थान होणार नाही
लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय घेणारी व जनतेच्या निधीतून चालणारी संस्था म्हणून कोणत्याही विद्यापीठाची ओळख असते. मात्र, ठरावीक लोक निर्णय घेऊ लागले, तर त्या संस्थेचे रूपांतर संस्थानात होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संस्थान होणार नाही, याची काळजी समाजातील सर्व घटकांनी घेतली पाहिजे, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले.