मुजीब देवणीकर, औरंगाबादशहरात महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या झपाट्याने कमी होत आहे. शाळा बंद पडण्याचे सत्र मोठ्या प्रमाणात सुरू झाले असून, आतापर्यंत तब्बल ९ शाळांना कुलूप लावावे लागले. बंद पडलेल्या शाळेच्या इमारती दुसऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांना भाडेतत्त्वावर देण्याचा धक्कादायक प्रस्ताव प्रशासनाने तयार केला. या प्रस्तावाला प्रतिसाद देत काही खाजगी संस्थांनी इमारती भाडेतत्त्वावर घेण्यासाठी अर्जही दाखल केले आहेत. मनपा प्रशासन गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देण्यात किती गंभीर आहे, हे यावरून दिसून येते.दहा वर्षांपूर्वी मनपाच्या शाळांची संख्या सुमारे ८३ होती. आज ही संख्या अवघी ७० पर्यंत येऊन ठेपली आहे. दरवर्षी विद्यार्थी संख्येअभावी एक-दोन शाळा बंद पडत आहेत. या गंभीर प्रकाराकडे मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अजिबात लक्ष देण्यास तयार नाहीत. मागील दोन वर्षांपासून महापालिकेला शासनाने शिक्षणाधिकारी दिला नाही. मनपातील एकाही लोकप्रतिनिधीने आपले राजकीय वजन वापरून शासनाकडून शिक्षणाधिकारी आणला नाही. खाजगी शैक्षणिक संस्थांची भरमसाठ फी देण्याची ऐपत नसलेले आणि अत्यंत गरीब नागरिक आपल्या पाल्यांना मनपा शाळेत आणून सोडतात. प्रत्येक पालकाला आपले पाल्यही खाजगी शाळेत टाकावे वाटते, पण आर्थिक परिस्थितीमुळे असंख्य पालक मनपा शाळेत मुलांना आणून टाकतात. या गरीब विद्यार्थ्यांसोबत मनपाची अजिबात सहानुभूती नाही. मध्यवर्ती बसस्थानकातून ट्रॅव्हल्सचालक ज्या पद्धतीने प्रवासी पळवून नेतात त्या पद्धतीने खाजगी संस्थाचालक मनपा शाळेतील विद्यार्थी पळवून नेत आहेत. मनपाच्या शाळा बंद व्हाव्यात म्हणून काही खाजगी संस्थाचालक जोरदार प्रयत्नही करीत आहेत.प्रगती कॉलनी घाटी परिसर स्लममध्ये मोडतो. या भागात दारिद्र्यरेषेखालील नागरिक राहतात. काही वर्षांपूर्वी मनपाने आपली शाळा बंद केली. शाळेत उरलेले विद्यार्थी बुऱ्हाणी नॅशनल स्कूल या शाळेत टाकण्यात आले. या शाळेला मनपाची इमारतही देण्यात आली. इमारतीचे भाडे वसूल करण्याचे काम सध्या मनपा प्रशासन करीत आहे. कैसर कॉलनी, जयभवानीनगर, लेबर कॉलनी, हडको एन-११, सिडको एन-६, विष्णूनगर, सिडको एन-९ येथील शाळा बंद पडल्या आहेत. या शाळांच्या इमारती खाजगी संस्थांना भाडेतत्त्वावर द्याव्यात, असा प्रस्ताव उपायुक्त प्रशासन यांनी ३ फेबु्रवारी २०१६ रोजी मालमत्ता विभागाकडे पाठविला आहे. त्यावर कारवाई सुरू आहे.
मनपा शाळांना ‘गळती’
By admin | Published: June 05, 2016 12:18 AM