वाळूज महानगर: वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात सिडकोच्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात आहे. याकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.
सिडको प्रशासन एमआयडीसीकडून पाणी घेऊन सिडको वाळूजमहानगर परिसरात पाणी पुरवठा केला जातो. या परिसरात पाणी पुरवठा करण्यासाठी सिडकोने एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून स्वतंत्र जलवाहिनी टाकलेली आहे. कामगार चौकालगत या जलवाहिनीला गळती लागलेली असून, या जलवाहिनीतून सतत मोठ्या प्रमाणात पाणी वाहुन जाते. विशेष म्हणजे या गळक्या जलवाहिनीवर गिरीराज हौसिंग सोसायटीतील नागरिक तसेच या परिसरातील विविध व्यवसायिक पाण्यासाठी गर्दी करीत असतात.
या जलवाहिनीवर दररोज कॅन व हंडे भरुन नागरिक व व्यवसायिक पाणी घेऊन जात असतात. कामगार चौकातील अनेक वाहनचालक या गळक्या जलवाहिनीवर अंघोळ व कपडे धुण्यासाठी गर्दी करीत असतात. सिडको प्रशासनाकडून या जलवाहिनीची दुरुस्तीही करण्यात येते.
मात्र, दुरुस्तीनंतर काही दिवसांत नागरिक पाणी भरण्यासाठी या जलवाहिनीला छिद्रे पाडून पाणी भरत असतात. या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहुन जात असून सिडको वाळूजमहानगर परिसरातील नागरिकांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या गळक्या जलवाहिनीची दूरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.