वाळूज महानगर : वडगावला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. त्यानंतर तात्काळ पाणीपुरवठा बंद करुन जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुुरु असल्याने अनेक भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
ग्रामपंचायतीने गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभापासून गावापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकली आहे. या जलवाहिनीला पोलीस आयुक्त मैदानासमोरील नाल्यात गळती लागली आहे. गुरुवारी सकाळी पाणी सोडल्यानंतर पाण्याचा दाब वाढून जलवाहिनीच्या गळतीचे प्रमाण वाढले. याबाबतची माहिती मिळताच ग्रामपंचायतीने तात्काळ सुरु असलेला पाणीपुरवठा बंद केला. व जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
मात्र, जलवाहिनीचा लोखंडी पाईप गंज चढल्याने दुरुस्ती करणे शक्य झाले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून या ठिकाणी नवीन पाईप टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांकडून सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम सुरुच होते.
पाणी पुरवठा न झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय झाली. यासंदर्भात ग्रामविकास अधिकारी एम.बी. ढाकणे म्हणाले की, दुरुस्तीचे काम हाती घेतले असून प्रगतीपथावर काम सुरु आहे. लवकरच जलवाहिनी दुरुस्त करुन गावचा पाणीपुरवठा सुरळित केला जाईल.