औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) एमडी-जेरियाट्रिक्स, एमडी-रेडिओथेरपी आणि डीएम-न्युनेटोलाॅजी या अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांसह यश संपादन केले.
वार्धक्यशास्त्र (एमडी-जेरियाट्रिक्स) विषयात महाराष्ट्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील पहिला पदव्युत्तर अभ्यासक्रम घाटीत सुरू झाला. २०१८ पासून दरवर्षी ३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. पहिल्या बॅचचे डाॅ. आशिष राजन, डाॅ. महेश पाटील, डाॅ. जेबा फिरदौस यांनी परीक्षेत यश मिळविले. डाॅ. आशिष राजन यांनी प्रथम क्रमांक मिळविला. एमडी-जेरियाट्रिक्समध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास दरवर्षी श्रीमती इंदुमती विश्वनाथ सोनावणी सुवर्णपदक देण्यात येणार असून, यावर्षी हे सुवर्णपदक डाॅ. राजन यांना प्रदान करण्यात येणार आहे. डाॅ. मंगला बोरकर, डाॅ. शैलजा राव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘एमडी-रेडिओथेरपी’ अभ्यासक्रम खंडित झाला होता. मात्र, टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे डॉ. कैलाश शर्मा, अधिष्ठाता डाॅ. कानन येळीकर, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेषकार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे हा अभ्यासक्रम पुन्हा सुरू झाला. एमडी-रेडिओथेरपी बॅचचे डाॅ. अर्पित गीते, डाॅ. रूपा बाला चंद्रन हे उत्तीर्ण झाले, अशी माहिती डाॅ. बालाजी शेवाळकर यांनी दिली. त्याबरोबरच डीएम-न्युनेटोलाॅजी अभ्यासक्रमाची पहिली विद्यार्थिनी डाॅ. सुकेना सुस्नेरवाला या राज्यात दुसऱ्या आल्याची माहिती नवजात शिशू विभागप्रमुख डाॅ. एल.एस. देशमुख आणि डाॅ. अमोल जोशी यांनी दिली.
------
फोटो ओळ
एमडी-जेरियाट्रिक्स अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचच्या यशस्वी विद्यार्थ्यांसह डाॅ. मंगला बोरकर आणि डाॅ. शैलजा राव.