छत्रपती संभाजीनगर : लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपालाच सुटावी, यासाठी पक्षातील जम्बो शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मुंबईत भेटले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ५ मार्च रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभेतून येथून कमळ पाठवा, असे आवाहन केले. त्यामुळे येथून भाजपाच पहिल्यांदा भाग्य आजमावणार हे स्पष्ट आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराची चाचपणी पक्षाने आजवर विविध पाहणीतून केली आहे. तरीही पक्ष अजून ठामपणे निर्णय घेण्यास तयार नाही. तसेच शिवसेना शिंदे गटाने देखील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे जागेच्या वाटाघाटीत काय निर्णय होणार याकडे भाजपातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांच्या नेतृत्वात भेट घेऊन लोकसभा भाजपा उमेदवाराने लढवावी, अशी मागणी केली. माजी महापौर भगवान घडमोडे, जिल्हाप्रमुख संजय खंबायते, माजी उपमहापौर राजू शिंदे, समीर राजूरकर, शिवाजी दांगडे, युवा मोर्चा शहराध्यक्ष रामेश्वर भादवे, अमाेल जाधव यांच्यासह सर्व मंडळ अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पक्षातील काही नेते, पदाधिकारी या शिष्टमंडळात नव्हते.
उमेदवारीवरून सुरू आहे खल...भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी बुधवारी २० उमेदवारांची यादी जाहीर केली. यादीत मराठवाड्यातील चार जागांवर उमेदवार जाहीर केले. त्यात छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा सस्पेन्स कायम आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर महायुतीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच संपली नसल्यामुळेच पहिल्या यादीत या जागेचा निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे. अंतिम वाटाघाटीत या जागेचा तिढा सुटणे शक्य आहे. जागा भाजपाच लढेल, परंतु उमेदवार कोण, यावरून पक्षांतर्गत खल सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. छत्रपती संभाजीनगरची जागा भाजप किंवा शिंदे गटाला जाईल; परंतु यात बाहेरचा उमेदवार नको, अशी मागणी भाजप आणि शिंदे गटाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे लावून धरली आहे.