सोयगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाच्या सोडतीचे आरक्षण शुक्रवारी (दि.२९) काढण्यात येणार आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाल्याने आता जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडत २९ जानेवारीला सकाळी अकरा वाजता जिल्हाभर एकाच दिवशी काढण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून तालुकापातळीवर ही प्रक्रिया होईल.
ग्रामपंचायतीच्या या आखाड्यात जिल्ह्यातील ६५२ ग्रा.पं.च्या सरपंचपदाची सोडत काढण्यात येणार असल्याने प्रशासकीय स्तरावर जिल्हाभरात पूर्वतयारी हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात झालेल्या निवडणुकापूर्वीच संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या सोडती काढण्यात आल्या होत्या; मात्र त्या सोडती रद्द करण्याबाबतचे आदेश ग्रामविकास विभागाने १६ डिसेंबरच्या पत्रानुसार काढले. त्यामुळे अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले. कारण अनेकांनी सरपंचपद डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीची आखणी केली होती. बहुतांश उमेदवार तर आपल्या प्रवर्गास सरपंचपद मिळणार असल्याने निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले होते; मात्र ग्रामविकास विभागाने निवडणुकीनंतर आरक्षण काढण्यात येणार असल्याचे स्पष्ट केल्याने अनेकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील ५७९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी मतदान झाले होते. यानंतर १८ जानेवारीला निकाल घोषित झाला असून मतदारांनी आपले गावपुढारी निवडले आहेत. आता या गावपुढाऱ्यातून सरपंचाची निवड करण्यात येणार असून आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात येईल.
--- सोयगावमधील ४६ ग्रा.पं.ची सोडत-----
सोयगाव तालुक्यात ४६ ग्रामपंचायती अस्तित्वात असून त्याठिकाणी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यात चाळीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागू झाल्या असून उर्वरित सहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी सोयगावातील ४६ ग्रामपंचायतींसाठी सोडत काढण्यात येणार असल्याचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी स्पष्ट केले.