विभागीय मंडळाची कार्यवाही : कॉपी प्रकरणी केंद्र संचालकालाच नोटीस़़़लातूर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१६ परीक्षेत कॉपी करणाऱ्या ९ विद्यार्थ्यांवर कारवाई करून रस्टीकीट करणाऱ्या केंद्र संचालकालाच लातूर विभागीय मंडळाने परीक्षेत घडलेल्या गैर प्रकारासंदर्भात खुलासा सादर करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत़ मंडळाची ही कारवाई म्हणजे चोर सोडून सन्याशाली फाशी अशीच चर्चा शिक्षकांमध्ये होत आहे़औसा तालुक्यातील प्रतिभा निकेतन माध्यमिक आश्रम शाळा मनोहर तांडा हे परीक्षा केंद्र संवेदनशिल म्हणून घोषीत केले होेते़ मंडळाने या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी स्वतंत्रपणे केंद्र संचालकांची नियुक्त करण्यात आली होती़ या नियुक्तीनुसार या परीक्षा केंद्रावरील केंद्र संचालकाने या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता़ मंडळाने फिरत्या पथकासह बैठे पथकाचीही नियुक्ती केली होती़ या दोन्ही पथकाने कसलीही कारवाई केली नाही़ पण केंद्र संचालकाने स्वत: ९ विद्यार्थ्यांना कॉपी करताना रंगेहाथ पकडले़ अन्य ठिकाणीही भरारी पथकाने परीक्षेत कॉपी पकडण्याची कारवाई केली़ त्यामुळे लातूर जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाला म्हणावे तसे पाठबळ मिळाले नाही़ ज्या ज्या केंद्रांवर कॉपी करताना विद्यार्थी आढळून आले अशा केंद्र प्रमुखांना शिक्षण मंडळाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत़ पण औसा तालुक्यातील प्रतिभा निकेतन माध्यमिक आश्रम शाळा मनोहर तांडा येथील केंद्र संचालकांनी स्वत: कारवाई केल्यानंतरही शिक्षण मंडळाने त्यांनाच नोटीस बजावली असून १० दिवसात खुलासा सादर करण्यासंदर्भात सूचनाही देण्यात आल्या आहेत़ बैठे पथक व फिरते पथक यांच्या कारवाईनुसार केंद्र संचालकांना नोटीस मिळाली असती तर ती कारवाई संयुक्तीक ग्राह्य धरली गेली असती़ पण केंद्र संचालकानेच कारवाई करून त्यांनाच नोटीस बजावल्याने शिक्षण क्षेत्रात चर्चा सुरु असून, शिक्षण मंडळाची कारवाई म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी असल्याचे दिसून येते़ (प्रतिनिधी)१४ केंद्र प्रमुखांना बजावल्या नोटिसा़़़परीक्षेच्या कालावधीत ज्या ज्या परीक्षा केंद्रावर गैर प्रकार घडले़ त्या १४ केंद्र प्रमुखांना नोटिसा बजावल्या आहेत़ कॉपीमुक्त अभियान राबविण्यास आपण कोठे कमी पडलो यासाठी त्यांना खुलासे सादर करण्याच्या सुचनाही सादर केल्या आहेत़ त्यानुसार सर्व केंद्र संचालकांसह मनोहर तांडा येथील केंद्र संचालकांनाही नोटीस बजावली आहे़ ती केवळ माहिती घेण्यासाठी कारवाईचा उद्देश नसल्याचेही शिक्षणाधिकारी डॉ़ गणपत मोरे यांनी सांगितले़
चोर सोडून सन्याशाला फाशी
By admin | Published: May 02, 2016 11:54 PM