सोयगाव (औरंगाबाद) : शेतात निंदणीचे काम करणाऱ्या पती-पत्नीवर बांधावरील गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. पत्नीला बिबट्याने पकडल्याचे लक्षात येताच पतीने बिबट्याशी तासभर झुंज देऊन पत्नीला सोडविले. ही घटना रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास कवली शिवारात घडली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
भारत हरिचंद चव्हाण (३०) आणि मनीषा (२३) शेतात खुरपणीचे काम करत होते. तेथे बांधलेल्या झोक्यात त्यांचा चिमुकला मुलगा होता. गवतात दबा धरून बसलेला बिबट्या तान्हुल्याकडे जाताना दिसताच आई मनीषा मुलाला वाचविणयासाठी पुढे गेल्या. बिबट्याने त्यांना पकडले. हे पाहून पत्नीला वाचविण्यासाठी भारत धावले. त्यांनी बिबट्याशी तासभर झुंज देऊन पत्नीची सुटका केली. परंतु चवताळलेल्या बिबट्याने त्यांना जबड्यात धरल्याने मनीषा यांनी आरडाओरडा केला. तेव्हा अजमोद्दिन तडवी, मनोज पाटील आणि विष्णू पाटील हे धावून आले. त्यांनी बिबट्याशी झुंज देऊन भारत यांना सोडविले व बिबट्याला हुसकावून लावले.
तिघे आले देवदूत बनून...बिबट्याने चौघांना तब्बल दोन तास झुंजविले. अजमोद्दिन तडवी, मनोज पाटील, विष्णू पाटील हे तिघे पती- पत्नीसाठी देवदूत बनून आले. गंभीर जखमी झालेल्या भारत व मनीषा यांना जळगावला हलविले आहे.