औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी मतमोजणीची पहिल्या फेरी पूर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांना २७, ८७९ मते मिळाली असून भाजपचे शिरीष बोराळकर यांना १०९७३ मते मिळाली आहेत. सतीश चव्हाण यांनी १६,९०६ मतांची आघाडी घेतली आहे.
पदवीधरसाठी नाव नोंदणी केलेल्या ३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख ४० हजार ७९६ मतदारांनी मतदान केले आहे. ५६ हजार मतांच्या मोजणीची पहिली फेरी नुकतीच पूर्ण झाली आहे. यात महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी १६, ९०६ मतांची आघाडी घेतली आहे. भाजपचे शिरीष बोराळकर यांना १०, ९७३ मते तर सतीश चव्हाण यांना २७, ८७९ मते मिळाली आहेत. बीड येथील अपक्ष उमेदवार सिद्धेश्वर मुंडे आणि रमेश पोकळे यांनी घेतलेल्या मतांनी पहिल्या फेरीत चुरस वाढली आहे. तसेच पहिल्या फेरीत तब्बल ५५०० मते बाद झाली आहेत.
सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू होताच सर्व मतपेट्यांमधील मतपत्रिका या एका दहा बाय दहाच्या मिक्सिंग ड्रममध्ये टाकण्यात आल्या आहेत. त्यानंतर दोन सभागृहांमध्ये प्रत्येकी २८ टेबलवर २५ मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे मोजणी करण्यात येत आहे. हे करीत असतानाच वैध मतपत्रिका काढण्यात येत आहेत. त्यानंतर ३५ उमेदवारांच्या पसंतीनुसार मतपत्रिका पिजन बॉक्समध्ये वर्ग करण्यास येतात. मतमोजणीच्या पाच फेऱ्या होणार असून त्यामध्ये वैध मतांची बेरीज करून पहिल्या पसंतीच्या मतानुसार विजयी होण्यासाठी कोटा ठरेल. वैध मतांच्या संख्येला दोनने भागून त्यात १ अधिक केल्यानंतर जी संख्या येईल, ती संख्या विजयासाठी कोटा म्हणून निश्चित करण्यात येईल.