- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : आंबट, गोड असा स्वाद असलेला रानमेवा म्हणून सर्वपरिचित गावरान बोरांना एवढा भाव चढला आहे की, सध्या सफरचंदापेक्षाही ती महाग आहेत. बाजारात सफरचंद १०० रुपये किलो, तर गावरान बोरं १२० रुपये किलोपर्यंत विकली जात आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात डोंगर रांगात, नाला काठेला, शेतात बोरांची असंख्य झाडे आहेत. दिवाळी संपली की, थंडीला सुरुवात होते व गावरान बोरं विक्रीला येतात. टोपलीत रचून ठेवलेली बारीक लाल, हिरवी बोरं, काही जास्त पिकलेली बोरं खाण्यास आंबट-गोड लागत असल्याने तेवढ्याच चवीने खाल्ली जातात. तरुणी, महिलांना गावरान बोरं जास्तच आवडतात. ग्रामीण भागातील महिला, पुरुष डोंगररांगात, वनराईत फिरून बोरं वेचून आणतात व विकतात. अनेकांनी शेतातही बोराची झाडे लावली आहेत. बोेरांचे आयुर्वेदात मोठे महत्त्व आहे. यामुळे आता बोर खाण्याकडे अनेकांचा कल वाढत आहे. बोर वाळवून त्याचे ‘लब्दू’ तयार केले जातात. सध्या सुरुवातीला बोरांची आवक कमी असल्याने भावाने शंभरी पार केली आहे. मात्र डिसेंबर महिन्यात भाव कमी होतील. सध्या तरी सफरचंदापेक्षा जास्त भाव बोराला मिळत आहे.
बोरन्हाणाची परंपरा१ ते ५ वर्षे वयाच्या बाळांना बोरन्हाण घातले जाते. कमी वजनाची बोरे टणाटण पडल्याने डोक्यातील प्रेशर पॉइंट्स सक्रिय होतात, असे यामागचे शास्त्रीय कारण सांगितले जाते. यामुळे सुरुवातीला गावरान बोरांचे भाव चढलेले असतात.
यंदा चमेली बोरांची आवक कमीगावरान बोरांआधी मोठ्या आकारातील चमेली बोरं बाजारात येत असतात. मात्र यंदा अपेक्षेनुसार या बोरांची आवक वाढली नाही. जळगाव, सोलापूर या भागांतूनही बोरं येतात. सध्या ४० ते ५० रुपये किलोने ही बोरं मिळत आहेत.
शेतात बोरांच्या झाडांचे प्रमाण वाढलेमध्यंतरी चमेली बोरांना मोठी मागणी असे. पण हे बोर चवीला पांचट लागत असल्याने आता ग्राहक पुन्हा गावरान बोरांकडे वळले आहेत. यामुळे अनेकांनी शेतात गावरान बोरांची झाडे लावली आहेत. बोरकूटसाठीही बोरांना मागणी असते. यंदा पोषक वातावरणामुळे बोरांचे उत्पादन भरपूर आहे.- संजय पाटील (कृषी शास्त्रज्ञ )
सुरुवातीला चांगला भावआता १००च्या पुढे भाव असला तरी महिनाभरात ८० रुपये किलोपर्यंत भाव उतरेल. बोरांची झाडे सर्वत्र असतात; फक्त वेचण्याचे परिश्रम घ्यावे लागतात.- सय्यद पठाण, शेतकरी