छत्रपती संभाजीनगर : ‘निम्बुडा, निम्बुडा निम्बुडा अरे काचा काचा, छोटा छोटा निम्बुडा लाई दो’ हे ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातील हे गाणे सुपरहिट ठरले होते... त्याची आठवण आता येण्याचे कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. निम्बुडा म्हणजे ‘लिंबू’ होय. उन्हाळ्याची चाहूल लागली असून बाजारात लिंबू १५० रुपये किलोने मिळू लागले आहे... यामुळे घरात बायकोने ‘येताना लिंबू घेऊन या’ असे म्हटले की, नवऱ्याच्या डोळ्यासमोर १५० रुपये तरळायला लागतात.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबाने १५० रुपये गाठल्याने यंदा भाववाढ किती उच्चांक गाठते, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे साहजिकच आहे. उन्हाळ्यात सर्वाधिक लिंबास मागणी असते. पण याच काळात लिंबाचे उत्पादन कमी होते. देशभरात लिंबाची मागणी असल्याने भाव वाढत जातात. औरंगपुरा भाजी मंडईत लिंबू १५० रुपये किलोने विकत आहे. होलसेलमध्ये १०० ते १२० रुपये किलो भाव आहे. शहरात जागोजागी रसवंती सुरू झाल्या. लिंबू सरबत बनविणाऱ्या हातगाडीवाल्यांची संख्या वाढत आहे. आता रमजान महिनाही सुरू होणार आहे. सायंकाळी रोजा (उपवास) सोडताना लिंबाचा रस जास्त विक्री होईल. यामुळे यंदा लिंबाचे भाव ३०० रुपयांचा आकडा पार करतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
हैदराबादहून लिंबूची प्रतीक्षाउन्हाळ्यात हैदराबादहून लिंबू शहरात विक्रीला येतात. बारीक आकारातील व रसरशीत नसलेल्या या लिंबांमुळे स्थानिक लिंबांचे भाव थोडे कमी होतात.