छत्रपती संभाजीनगर : ‘मातोश्री’वर आम्हाला पैसे पाठवावे लागत होते हे खरंय. शिवसैनिकांनी सदस्य शुल्कापोटी दिलेले ५० कोटीदेखील यांनी (उद्धवसेना) स्वाहा केले, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारार्थ बजाजनगर, वाळूज येथील जाहीर सभेत केला. आम्हाला शिवसैनिकांची आत्मा असलेली शिवसेना ही संघटना वाचवायची होती म्हणून बंड केले. शिवसेनाप्रमुखांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचे सांगून शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा समाचार घेत खैरेंना मत म्हणजे खासदार इम्तियाज जलील यांना मत असल्याची टीका त्यांनी केली.
शिंदे म्हणाले, ठाकरे हे नकली हिंदुत्ववादी आहेत. त्यांना पैशाची भूक आहे. लेना बँक आहे, देना बँक त्यांना माहिती नाही. शिवसैनिकांना नोकर समजत होते. आता जो काम करील तो मोठा होईल. ‘राजा का बेटा राजा नहीं, तो जो काम करेगा व राजा बनेगा’. आयत्या पिठावर रेघोट्यादेखील मारता येत नाहीत. असे बोलून त्यांनी आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला. ठाकरे यांच्या उपचारावेळी आम्ही काही केले नाही. ज्या दिवशी शिवसैनिकांवर आरोप केले, त्याच दिवशी दावणीला बांधलेली शिवसेना सोडविण्यासाठी सत्तेला लाथ मारली. त्यांना उपमुख्यमंत्री फडणवीसांसह चार ते पाच भाजपाच्या नेत्यांचे व माझे राजकारण संपवायाचे होते. त्याआधी मीच त्यांचा टांगा पलटी केला. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आ. संजय शिरसाट यांची भाषणे झाली. पणनमंत्री अब्दुल सत्तार, शिरीष बोराळकर, आदींची यावेळी उपस्थिती होती. राजेंद्र जंजाळ यांनी सूत्रसंचालन केले.
खैरेंच म्हटले होते ‘मातोश्री’वर पैसे द्यावे लागतातमहाविकास आघाडीचे उमेदवार खैरे यांनीच मातोश्रीवर पैसे द्यावे लागतात. असा आरोप केला होता आणि ते सत्य होते. आमच्या उठावामुळे खैरेंना मातोश्रीची दारे उघडली. आम्हाला ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या काळात वर्षा बंगल्यावर येऊ दिले नाही. दिवस-दिवस बाहेर बसून आम्ही निघून जायचो. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील यांनीदेखील अनेकदा अनुभव घेतला आहे. खैरेंना २० वर्षे संधी दिली; त्यांनी काहीही केले नाही तर, खा. जलील यांनादेखील कुठलाही विकास करता आला नाही.- संदीपान भुमरे, महायुतीचे उमेदवार