छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात १ जानेवारी ते ३० एप्रिल या चार महिन्यांत ३०५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कमी शेती, शाश्वत सिंचनाचा अभाव, लहरी निसर्गामुळे गुुंतवणूक व श्रमाच्या तुलनेत शेतीतून उत्पन्न मिळत नसल्यामुळे दिवसेंदिवस होत जाणारे हलाखीचे जगणे, त्यातच सरकारी बँकांचे कर्ज फेडण्यासाठी पाच ते दहा टक्क्यांनी सावकारी कर्जाच्या फासात अडकल्यानेच नाईलाजाने काही शेतकरी मरणाला जवळ करत आहेत, अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली.
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यासाठी बळिराजा सर्व्हे सुरू केला आहे. यानिमित्त सोमवारी जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा जगण्याचा संघर्ष उलगडला. फर्दापूरच्या मीना दिलीप अंबूरे, खुलताबादचे गणेश गायकवाड, फुलंब्रीचे गणेश गव्हाणे, बाजारसावंगीतील सय्यद लाल या शेतकऱ्यांनी त्यांचे जगणे म्हणजे काय, याचा पट उभा केला. बोगस बियाणे, सावकारी कर्ज, सरकारी बँकांकडून होणारी हेळसांड, नैसर्गिक आपत्ती, उत्पन्नाची हमी नसणे, कुटुंबांची जबाबदारी, जोडधंदा नसल्यामुळे शेती आतबट्ट्याचा खेळ झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सरकार, प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढत आहे. गेल्यावर्षी १ हजार २२ आत्महत्या झाल्या. त्यात सर्वाधिक २७० आत्महत्या या बीड जिल्ह्यातील होत्या. यंदाही बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद झाली. जालना, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या पाच जिल्ह्यांत चार महिन्यांत १८४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. धाराशिव, परभणी जिल्ह्यांत ८६ शेतकऱ्यांच्या आत्महत्येची नोंद झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ३५ आत्महत्या झाल्या आहेत.
मनात आत्महत्येचा विचार येतो....सरकारी कर्ज मोठे, चार एकर शेतीतील उत्पन्नातून कर्जफेड होत नाही. पती अपंग, मुलांची जबाबदारी आहे. ५ ते १० टक्के व्याजाने सावकारी कर्ज घेऊन सरकारी कर्ज फेडावे लागते आहे.-मीना दिलीप अंबूरे, शेतकरी फर्दापूर
रोज नैराश्याशी गाठ....शेतीतून उत्पन्न मिळत नाही. मी उच्चशिक्षित असून नोकरी नसल्याने आई-वडिलांसोबत शेती करतो. २ लाखांचे कर्ज असून सावकारी कर्जाविना पर्याय नाही. रोज नैराश्याशी गाठ पडते.-गणेश गायकवाड, शेतकरी खुलताबाद
अनेक अडचणी आहेत....नैराश्याने कुटुंब ग्रासले आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक अडचणी आहेत. चार एकर शेती आहे, परंतु तलावालगत असल्याने दरवर्षी वाहून जाते. उत्पन्न मिळत नसल्यामुळे कर्जाविना जगता येत नाही.-ज्ञानेश्वर गव्हाणे, शेतकरी फुलंब्री
जिल्हा चार महिन्यांतील शेतकरी आत्महत्यांची संख्याऔरंगाबाद........ ३५जालना............२२परभणी...........२६हिंगोली............११नांदेड.............४७बीड .............८१लातूर...........२३धारशिव.......६०
हा आत्महत्यांचा वाढता आलेखवर्ष शेतकरी आत्महत्येचा आकडा....२०२०..........७७३२०२१..........८८७२०२२.......... १,०२२२०२३ (३० एप्रिलपर्यंत) ३०५