लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : पाण्याचे जार घरी घेऊन जात असताना रस्त्यात बिबट्याचे दर्शन झाल्याने जार रस्त्यात टाकून दुचाकीने वाळूज गाठल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये वाळूज शिवारात बिबट्याचा वावर असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वाळूज शिवारातील वाळूजसह वाळूजवाडी, हनुमंतगाव परिसरात बिबट्या फिरत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये मागील दोन-चार दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू आहे. वाळूजवाडी येथील शेतकरी श्रीरंग जनार्दन आरगडे यांना रविवारी रात्री बिबट्याचे दर्शन झाल्याने या चर्चेला आधार मिळत आहे. गावात शुद्ध पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आरगडे हे पाण्याचा जार आणण्यासाठी वाळूजला आले होते. वाळूजवरून पाण्याचा जार घेऊन दुचाकीने घरी जात असताना गट नंबर १६७ मध्ये रस्त्यातच लाईटच्या प्रकाशात बिबट्या दिसून आला. अचानक बिबट्या दिसल्यामुळे आरगडे यांची भीतीने भंबेरी उडाली. घाबरलेल्या आरगडे यांनी जीव वाचविण्यासाठी जवळचा पाण्याचा जार घटनास्थळीच टाकून दुचाकीचा लाईट बंद-चालू करीत अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरून घरी न जाता आणि थेट वाळूज गाठले. वाळूजला परत आल्यावर त्यांनी माजी उपसरपंच खालेद पठाण यांना व इतर गावक-यांना तसेच वाळूजवाडी येथील सहकारी मित्रांना माहिती दिली. त्यामुळे गावातील १५-२० तरुण हातात लाठ्या-काठ्या, बॅटरी व ठेंभे घेऊन दुचाकीने वाळूजला आले. त्यानंतर घाबरलेले आरगडे घरी गेले. विशेष म्हणजे यापूर्वीही वाळूज शिवारात नागरिकांना अनेकदा बिबट्याचे दर्शन झाले आहे. काही महिन्यांपूर्वी एका गायीचा वन्य प्राण्याने फडशा पाडला होता. मात्र, तो वन्य प्राणी कोणता होता, हे वन विभागालाही सांगता आले नव्हते.वाळूज ते वाळूजवाडी रस्त्यावर कायम नागरिकांची ये-जा सुरू असते. दोन दिवसांपूर्वी कुंदन राजपूत व पवन राजपूत हे दोघे वाळूजवरून रात्री १० वाजता वाळूजवाडीला जात असताना त्यांना गट नंबर १६१ मध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनीही वेगाने दुचाकी पळवून घर गाठले होते.
वाळूज शिवारात आठवड्यात दुसऱ्यांदा दिसला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 1:22 AM