औरंगाबाद: शिकार न सापडल्याने मरणासन्न अवस्थेत बिबट्या रविवारी कृष्णापुरवाडी शिवारात आढळला. याची माहिती तात्काळ वनविभागाला देण्यात आली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब तौर यांनी वनरक्षक/ वनपाल तसेच वन्यप्राणी बचाव पथकाच्या सदस्यांसह घटनास्थळ गाठले. वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या वैद्यकीय उपचार, खानपान आणि औषधोपचारांने अखेर तो बिबट्या भानावर आला.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक दिवसांपासून उपाशी असलेला बिबट्या बेशुद्धावस्थेत कृष्णापुरवाडी येथे आढळला होता. यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी रोहित धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला पकडण्यात आले. आजारी बिबट्यावर संजय गायकवाड(रिजनल जॉईंट कमिशनर औरंगाबाद पशुवैद्यकीय विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी रोहित धुमाळ हे उपचार करीत आहेत.
सध्या बिबट्याची प्रकृती स्थिर असून तो औषधोपचाराला प्रतिसाद देत आहे. मुख्य वनसंरक्षक सत्यजित गुजर, उपवनसंरक्षक सूर्यकांत मंकावार, सहाय्यक वनसंरक्षक अरुण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी दादा तौरहेदेखील यावेळी उपस्थित होते. कारवाईच्या वेळी वनपाल राजेश देशमुख, वनपाल सुधीर धवन, वनरक्षक राठोड, चव्हाण, सूर्यवंशी, चोरमारे, भोसले, वाहन चालक अहिरे इत्यादी कर्मचारीही सहभागी होते.