औरंगाबाद : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे सप्टेंबर महिन्यात अनेक अडचणींना सामाेरे जावे लागले होते. त्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयात खाटांची संख्या २०० वरून ३०० करण्यात आली. परंतु रूग्णसंख्येत घट झाल्याने सध्या ६१ टक्के खाटा रिक्त असून सध्या याठिकाणी ११६ रूग्ण दाखल आहेत.
२५ सप्टेंबरपासून रूग्णसंख्येत घट होत असल्याने रूग्ण कमी आणि खाटा अधिक अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिल्हा रूग्णालयात ३०० खाटांत १२० ऑक्सिजन बेड आहेत. तर ८ आयसीयू बेड आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मार्चमध्ये जिल्हा रूग्णालयात लाखो रूपये खर्चून पार्टीशनद्वारे स्वतंत्र कक्षाची सुविधा तयार करण्यात आली होती. परंतू खाटांची संख्या वाढविण्यासाठी हे कक्ष काढण्यात आले होते.