चितेगाव : पैठण तालुक्यातील केसापुरी गावात सौर यंत्र संच उपलब्ध करून देण्यात आल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भारनियमनातून मुक्तता झाली आहे. यामुळे या शाळेतील विद्यार्थी डिजिटल ज्ञानाचे धडे विनाअडथळा गिरवत आहेत.
पैठण तालुक्यातील पैठणखेडांतर्गत असलेल्या केसापुरी गावात जिल्हा परिषदेची इयत्ता १ ली ते ५ वीपर्यंत शाळा असून, २७ विद्यार्थी ज्ञानार्जन करतात. ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएम) या योजनेंतर्गत गावातील शाळेचा विकास होत आहे. त्या निधीतून शाळेसाठी संगणक संच, प्रोजेक्टर व पडदा देण्यात आला होता. परंतु शाळेतील वीज मीटर देयके थकीत असल्यामुळे दोन वर्षांपासून संगणक बंद होते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिकवण्यासाठी अडचणी येत होत्या.
मुख्याध्यापक अमोल एरंडे यांनी ही बाब ग्राम परिवर्तक आरती मोरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी तात्काळ याची दखल घेऊन व्हीएसटीएम निधीतून ६० हजार रुपये किमतीचा २४ वॅटचा सौरऊर्जा संच ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात आला. यावर शाळेतील ट्यूब, फॅन, मोटार, संगणक, प्रोजेक्टर ही सर्व उपकरणे चालतात. यामुळे विद्यार्थी संगणकाच्या साह्याने मोठ्या पडद्यावर डिजिटल ज्ञानाचे धडे गिरवू लागले आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध करण्यात आला आहे. महावितरणच्या भारनियमनाच्या जाचातून शाळेची मुक्तता झाली आहे.(फोटो आहे)