लातूर : जिल्हा परिषदेच्या वतीने महिलांना स्वावलंबनाचे धडे देण्यात येत आहेत. यापूर्वी कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले. आता ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५३९३ महिलांना ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. १५ सप्टेंबरपासून जिल्हाभरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुक्याच्या ठिकाणी ३० प्रशिक्षण केंद्रामार्फत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने ग्रामीण भागातील महिला व मुलींसाठी शेष फंडातून सन २०१४-१५ च्या योजनेअतंर्गत तालुकास्तरावर व तालुकाअंतर्गत गावाच्या ठिकाणी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण देण्यासाठी महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्थेची निवड करण्यात आली आहे़ या सेवाभावी संस्थेच्या वतीने जिल्हाभरात २५ केंद्राच्या माध्यमातून महिला व मुलींना ब्युटी पार्लरचे ५३९३ प्रशिक्षणार्र्थींना सहा महिन्यासाठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे़ या प्रशिक्षणासाठीचे निकष हे प्रशिक्षणार्थी ग्रामीण भागातील रहिवासी असावा त्यासाठी ग्रामपंचायत, तलाठी याचे रहिवासी प्रमाणपत्र असावे़ प्रशिक्षणार्थीच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न ५० हजारांच्या आत असणाऱ्यांची निवड करण्यात आली असून, प्रशिक्षणात व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व टिप्स शिकविल्या जाणार आहेत. जेणेकरून महिलांना त्यातून व्यवसायही करता येईल, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कागणे यांनी दिली़
महिलांना प्रशिक्षणातून स्वावलंबनाचे धडे
By admin | Published: October 17, 2014 12:24 AM