औरंगाबाद : ‘तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा, जेलमधून बाहेर आलो की, मी पुन्हा गुन्हे करीन’, अशी थेट धमकीच कुख्यात गुन्हेगार विकी ऊर्फ हेल्मेट याने पोलिसांनाच दिली.
एमपीडीएखाली एक वर्ष कारागृहात राहून बाहेर आल्यानंतर विकी ऊर्फ हेल्मेट याने साथीदारासह शहरात दोन महिलांचे मंगळसूत्र हिसकावल्याचे पोलीस तपासात समोर आले. त्यामुळे त्याला पकडून पोलीस चौकशी करीत असताना त्यानेही धमकी दिली. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला कामगार चौकात जाणाऱ्या रूपाली घरटे यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले होते. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी झटपट कारवाई करून आरोपी विक्की ऊर्फ हेल्मेट गौतम सोनकांबळे, अनिकेत रावसाहेब हिवाळे, सचिन जालिंदर पोपळघट यांना अटक केली. त्यांच्याकडून मंगळसूत्र जप्त केले.
आरोपी हेल्मेटवर अनेक गुन्हे दाखल आहेत. तडीपार केल्यावरही तो शहरात येऊन गुन्हे करीत होता. गतवर्षी त्याला एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले होते. नुकताच तो कारागृहातून सुटला. त्याने पुन्हा गुन्हे करण्यास सुरुवात केली. रूपाली यांचे मंगळसूत्र हिसकावून घेऊन जाताना तो आणि त्याचे साथीदार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. यामुळे तो पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याने ज्योतीनगरातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावल्याचे कबूल केले. पोलिसांनी खोटे गुन्हे नोंदविले, असा आरोप करून त्याने आणखी गुन्हे करण्याची धमकी दिली.
गुन्हेगारांचे धाडस का वाढले? विक्कीप्रमाणेच कुख्यात शेख जावेद ऊर्फ टिप्या एमपीडीएच्या कारवाईची मुदत संपल्याने कारागृहातून बाहेर आला होता. पोलिसांना न जुमानता त्याने पुंडलिकनगर रस्त्यावर कारच्या टपावर मैत्रिणीसोबत मद्यधुंद नृत्य केले.