सोयगाव : देशातील ८० कोटी जनतेला केंद्र सरकार मोफत धान्य देत असल्याच्या गप्पा मारू नका साहेब. आमचं दोन वर्षांपासून धान्य का बंद आहे, ते सांगा? असा प्रश्न सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे सोमवारी झालेल्या प्रचार सभेत ४ ते ५ ग्रामस्थांनी विचारल्याने महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे स्तब्ध झाले. आधी आमचं ऐकून घ्या, असे म्हणत दानवे यांनी यावेळी वेळ निभावून नेल्याचा प्रकार घडला.
जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जरंडी येथे सोमवारी दुपारी १२ वाजता प्रचार सभा आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर अल्पसंख्याक विकासमंत्री अब्दुल सत्तार, भाजपचे प्रदेश सचिव सुरेश बनकर, अल्पसंख्याकचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना दानवे यांनी, केंद्र सरकारने देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य दिल्याचे सांगताच सभेला उपस्थित ४ ते ५ ग्रामस्थ उभे राहिले. त्यांनी मोफत धान्य देत असल्याच्या गप्पा मारू नका साहेब. आमचं दोन वर्षांपासून धान्य का बंद आहे, ते सांगा? असा प्रश्न दानवे यांना केला. त्यावर दानवे यांनी आधी आमचं ऐकून घ्या. त्याशिवाय समजणार नाही, असे म्हणतं वेळ मारून नेली.
भाजप-सेना नेत्यांमध्ये द्वंद्वयावेळी शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील द्वंद्वही पाहावयास मिळाले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रभाकर काळे म्हणाले, राज्यात आपली युती असली तरी सिल्लोड-सोयगाव तालुक्यात भाजप युती धर्म पाळत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सोयगाव तालुक्यात भाजपसोबत काम करण्याची मानसिकता नाही; मात्र मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशाचा सन्मान करीत आम्ही काम करीत आहोत, असे सांगितले. त्यावर सत्तार यांनी याबाबत दानवे यांच्यासोबत ७ बैठका झाल्या आहेत. यावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे, असे सांगून चार महिन्यांत भाजप काय आहे, हे कळेलच असा टोला लगावला. यावेळी दानवे यांनीही आपली आणि सत्तार यांची ४० वर्षांची दोस्ती आहे. आम्ही भांडतो आणि एकही होतो. राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो, असे सांगत आमचं जमलं, तुमचं जमलं पाहिजे, तुम्ही जमवून घ्या, असा सल्ला दिला.