छत्रपती संभाजीनगर : शरणापूर ते साजापूर करोडीपर्यंतच्या ६ किलोमीटर रस्त्याच्या कामात महावितरणचे खांब तसेच ठेवून काँक्रिटीकरण उरकण्याचा सपाटा सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) नेमलेल्या कंत्राटदाराने लावल्यामुळे पीडब्ल्यूडी आणि महावितरणने एकमेकांच्या विरोधात गुरुवारी बोंबाबोंब केली.
‘विजेचे खांब आड आले तरी चालतील;रस्ता बांधा, खांब काढायचे नंतर बघू’ या मथळ्याखाली लोकमतने ५ ऑक्टोबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर महावितरणचे मुख्य अभियंता मोरहरी केळे यांनी पीडब्ल्यूडीच्या अभियंत्यांना मुख्यालयात बोलावून घेतले. पीडब्ल्यूडीने उपअभियंता डी. एस. कांबळे यांना पाठविले. खांब कोण काढणार, यावरून तांत्रिक मुद्द्यांसह चर्चा झाली.रस्त्यात खांब लावण्यापूर्वी महावितरणने विचार करणे गरजेचे होते. अलायनमेंटचा विचार न करता कंपनी मधोमध खांब लावते. त्यामुळे अशा अडचणी तयार होतात.अशी बाजू पीडब्ल्यूडीने मांडली तर कोणत्याही रस्त्याच्या रुंदीकरणानंतर महावितरणचे विद्युत खांब, तारा व रोहित्र स्थलांतरित करण्याची जबाबदारी ते काम करणाऱ्या आस्थापना, खाते, विभागाची असते, अशी भूमिका महावितरणने घेतली.
महावितरण जबाबदार नाहीमहावितरण केवळ संबंधितांना कामाचे अंदाजपत्रक व कामासाठी वीजपुरवठा बंद करून कामाची देखरेख करते. महावितरणची यात कसलीही जबाबदारी नाही. पीडब्ल्यूडीच्या मागणीनुसार शरणापूर ते साजापूर - करोडी रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक १.३ टक्के डीडीएफ योजनेत मंजूर करून महावितरणने त्यांना दिले होते. या कामाच्या देखरेख शुल्काचा भरणा महावितरणकडे त्यांनी केलेला आहे. यानंतर हे काम पीडब्ल्यूडीने ठेकेदाराकडून करून घेणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्या अंतर्गत कारणांमुळे ते काम रेंगाळले. याला महावितरण जबाबदार नाही.
पीडब्ल्यूडीने पत्र देऊन हात झटकले..महावितरणने रस्त्याच्या मधोमध व दोन्ही बाजूला असलेले डीपीसह १६४ विद्युत खांब तातडीने काढून घ्यावेत. भविष्यात दुर्घटना होऊ नये, यासाठी हे महत्त्वाचे आहे. उजव्या बाजूला ६८ तर डाव्या बाजुला ४ डीपींसह ९८ विजेेचे खांब आहेत. रस्त्याच्या कामात हे खांब अडथळा निर्माण करीत आहेत. त्यामुळे रुंदीकरणाचे काम करण्यात अडचणी येत आहेत. उच्च दाब विद्युत वाहिनीमुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे पत्र पीडब्ल्यूडीचे उपअभियंता डी. एस. कांबळे यांनी महावितरण ग्रामीण कार्यकारी अभियंत्यांना देऊन खांब काढण्याची जबाबदारी महावितरणचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी सांगितले, कंत्राटामध्ये तरतूद आहे. महिन्याभरात ते खांब काढण्यात येतील.