छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट सिटीमार्फत शहरात ९० स्मार्ट बसेस दररोज चालविण्यात येतात. प्रवाशांना दर्जेदार सोयीसुविधा मिळाव्यात, या दृष्टीने स्मार्ट सिटी प्रशासनाकडून वारंवार नवीन स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून ‘चलो’ ॲपचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. या ॲपवरून प्रवाशांना घरबसल्या तिकीट खरेदी करता येईल. ज्या बसने जायचे आहे, त्या बसचे लाईव्ह लोकेशनही पाहायला मिळणार आहे.
स्मार्ट बसला शहरवासीयांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील पाच वर्षांमध्ये प्रमुख मार्गावरील बसेस भरून ये-जा करतात. तोट्यात सुरू असलेली बससेवा अधिक चांगली कशी करता येईल. आर्थिक उत्पन्नाचे स्रोत कसे बळकट करता येतील, या दृष्टीने सीईओ जी. श्रीकांत यांनी ठोस पाऊले उचलायला सुरुवात केली. बसेसकडे जास्तीत जास्त प्रवासी आकर्षित करण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक ॲप तयार करण्याचे निर्देश दिले. ‘चलो’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले. प्रवाशांना गुगल प्ले स्टोअरमधून हे ॲप डाऊनलोड करता येईल, अशी माहिती शहर बसचे मुख्य चालन व्यवस्थापक संजय सुपेकर यांनी दिली.
या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जोगदंड, प्रकल्प व्यवस्थापक फैज अली, बसचे उपव्यवस्थापक प्रमोद देशमुख, विलास काटकर, ‘चलो’च्या संस्थापक प्रिया सिंह, व्ही. पी. अरुण व शहरप्रमुख शुभम निंबळवार यांनी परिश्रम घेतले. रेल्वेत काम केल्याचा अनुभव येथे कामी आला. प्रवाशांना हे ‘ॲप’ खूप फायदेशीर ठरणार असल्याचे जी. श्रीकांत यांनी सांगितले.
चलो ॲपचे फायदे काय?प्रवासी ऑनलाइन घरबसल्या तिकीट खरेदी करू शकतात, पास बनवून घेऊ शकतात. ज्यासाठी यूपीआयआय, नेट बँकिंग डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा मोबाईल वॉलेटच्या माध्यमाने पैसे भरता येतील. बसचे लोकेशन कळेल, थांब्यावर बस किती वेळात येईल, हे कळेल. बसमध्ये किती जागा रिकाम्या आहेत, हेसुद्धा माहीत होईल.