छत्रपती संभाजीनगर : देशभरातील विविध भागातून पूजा करुन आणलेल्या ११ हजार रुद्राक्षांची ८ फुटी रुद्राक्ष गणपती मूर्तीचे दर्शन त्या सोबत एकाच ठिकाणी अष्टविनायकाचे दर्शन घडले तर... होय, खडकेश्वर मैदानावर उभारण्यात आलेल्या १५० बाय १२० डोममध्येच तुम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन होणार आहे. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रुद्राक्ष गणपती पाहण्यासाठी भाविकांनी येथे गर्दी केली होती.
माहेश्वरी गणेश मंडळाने हा भव्य दिव्य देखावा उभारला आहे. ११ हजार १११ रुद्राक्षांची ‘श्री’ची मूर्तीची प्रतिष्ठापना मंगळवारी करण्यात आली. या मूर्तीसाठी रुद्रांक्षांचे बारा ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात विशेष पूजन करण्यात आले आहे. हे सर्व रुद्राक्ष मध्यप्रदेशातील सिहोर येथून आणण्यात आले आहे. ही मूर्ती हिंगोली येथील मूर्तिकारांनी बनविली आहे. याशिवाय अष्टविनायक गणेशाच्या मूर्तीचीही येथे प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विसर्जनानंतर हे सर्व रूद्राक्ष भाविकांना वाटण्यात येणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
विशेष म्हणजे तिथे साधू-संतांच्या ‘कुटिया’चे स्वरुप देण्यात आले आहे. ८ कुटियामध्ये अष्टविनायकाचे दर्शन घडत आहे. तसेच या कुटियांमध्ये दररोज शेणांनी सारविले जात आहे. एक पावित्र्य यामुळे येथे निर्माण झाले आहे. गणेशोत्सव यशस्वीतेसाठी अध्यक्ष जगदीश बियाणी तसेच मंडळाचे कैलास मुंदडा, सचिन कारवा, शीतल दरक, रेखा राठी, ॲड. प्रकाश साबू, राकेश चांडक यांच्यासह माहेश्वरी समाजाचे १६ प्रभाग व ११ संस्थेचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
पंचकुंडी गणेश यागासाठी कुटिया तयारमाहेश्वरी गणेश मंडळाच्यावतीने २३ ते २८ सप्टेंबर दरम्यान पंचकुंडी गणेश यागाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज २० यजमान या यज्ञाला बसणार आहे. यासाठी मोठ्या आकारातील लाकडापासून कुटिया तयार करण्यात आली आहे. ही कुटिया भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहे.