- पालकमंत्री सुभाष देसाई
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अनेकांच्या बलिदानातून, असीम शौर्यातून आपल्या स्वातंत्र्याच्या खडतर लढाईला 15 ऑगस्ट 1947 रोजी यश मिळाले. म्हणूनच हा स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीयासांठी, देशाच्या सर्व नागरिकांसाठी आनंदाचा, अभिमानाचा प्रेरणा दिवस आहे. देशभरात दरवर्षी हा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा केल्या जातो.मात्र यावर्षी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याचे आव्हान पेलत आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.
या संकटाच्या काळात एक प्रकषाने लक्षात आले की, ध्येयासक्त होऊन काम करत राहीलो तर संकट किती ही मोठे वा अवघड असो , त्याला यशस्वी सामोरे जाणे शक्य होतेच. कोरोनाच्या संकटाला यशस्वीपणे लढा देत असतांना हाच अनुभव आपण मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात घेत आहोत. जिल्ह्यातही सर्व प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य, पोलीस यंत्रणा यांच्या युद्धपातळीवर सुरु असलेल्या प्रयत्नांना इतर सर्व यंत्रणा, लोकप्रतिनिधीं, स्वयंसेवी संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे गेल्या चार पाच महिन्यांपासून आपण कोरोना विषाणू विरुद्धचा लढा यशस्वीपणे लढत आहोत. यामध्ये शासनाच्या सूचना, निर्णयांचे, प्रशासनाच्या उपाययोजनांचे नागरिक पालन करत सहकार्य करत आहेत.
आपल्या सर्व डॉक्टर, नर्सेस, पोलीस, अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, आशा सेविका, स्वयंसेवक यासह गेल्या चार पाच महिन्यापासून समर्पित भावनेतून काम करणारे प्रत्येकजण या सर्व कोरोना योध्यांच्या अथक परिश्रमामूळेच आपल्या जीवित संरक्षणाची ही लढाई सुरु आहे. या सर्वांच्या कामाप्रती आपल्या सर्वांच्या मनात आपुलकीच्या भावना आणि हार्दिक आभाराची जाणीव आहे. या सर्वांच्या अथक परिश्रमांमुळे राज्यात लाखोंच्या संख्येने रूग्ण बरे होत असून आपल्या जिल्ह्यातही संसर्गाच्या प्रमाणात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे निश्चितच आशादायी असून आतापर्यंत 13 हजार 254 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले आहेत. तर रुग्ण बरे होण्याचा दर 73.28 टक्के असून हा मोठा दिलासादायक आहे. जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्याचे आव्हान यशस्वी करत असताना आपण मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. गेल्या महिनाभरात मृत्युदर कमी करण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असून 4.25 वरुन तो आता 3.23 वर आला आहे.
आरोग्य सुविधांचे बळकटीकरण योग्य नेतृत्व आणि काम करण्याची इच्छाशक्ती असणारी यंत्रणा यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपत्तीमध्येही इष्टापत्ती कशी निर्माण करता येते, याचे उत्तम उदाहरण औरंगाबाद जिल्ह्याने उभे केले आहे. मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी सर्व लक्ष केंद्रीत करत आरोग्य सुविधा,उपचार यासाठी प्राधान्याने निधीची उपलब्धता, जिल्हास्तरावार अधिकारांचे विकेंद्रीकरण करून या संकट काळात रूग्णाच्या जिवित संरक्षणासाठी आरोग्य यंत्रणाच्या सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात आपण गेल्या चार महिन्यात गतिमानतेने आरोग्य सुविधांमध्ये लक्षणीय वाढ केली. आज घाटी या शासकीय रूग्णालयातून गंभीर स्थितीतील कोरोनाचे रूग्ण बरे होण्याचे प्रमाण हे राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय रूग्णालयांच्या तुलनेत अग्रक्रमावर आहे. घाटीत औषध वैद्यकशास्त्र इमारत आणि अतिविशेषोपचार इमारत दोन्ही ठिकाणी कोविड वर उपचार सुरू असून एकूण 456 खाटा उपलब्ध असून यापैकी 378 ऑक्सीजन बेड तर 78 आयसीयु बेड आहेत. आतापर्यंत गंभीर स्थितीत दाखल झालेल्या 1531 रूग्णांपैकी 819 रूग्ण बरे झाले आहेत. जिल्हा रूग्णालयही या आपत्ती काळात पूर्ण क्षमतेने उत्कृष्ट काम करत असून वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन डिसीएचसीचे रुपांतर डिसीएच मध्ये करण्या बाबत प्रक्रिया सुरु असून जिल्हा रुग्णालयात आठ बेडचे आयसीयु कार्यान्वीत करण्यात आले आहे तसेच आणखी सतरा बेडचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच मनुष्य बळ, पूरेसा औषधसाठा, व्हेंटीलेटर, ऑक्सीजन बेड, उपलब्धता अधिक सक्षम करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे सिपेट येथील मेल्ट्रॉन कोवीड रूग्णालय अवघ्या दिड दोन महिन्यात सुरू करण्यात आले.त्याच्या माध्यमातुन संसर्गजन्य रोगांच्या उपचारासाठी एक सुविधांयुक्त रूग्णालय जिल्ह्यात या आपत्तीच्या काळात उभे राहीले आहे. मनपाच्या आरोग्य विभागामार्फतही कमी वेळेत झपाट्याने 29 विलगीकरण कक्ष, अकरा कोविड सेंटर 2033 खाटांच्या सुवीधांसह सज्ज करण्यात आले. त्या ठिकाणी सर्व सुविधा चांगल्या प्रकारे पुरवल्या जात असून याबाबत रूग्णांनी समाधान व्यक्त केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे स्वॅब टेस्ट मुळे पॉझिटिव्ह रुग्णांचे लवकर निदान झाले (Catch them early) व त्यांच्यामुळे होणारा प्रसार थांबला गेला, साखळी तुटण्यास मदत झाली. शहरात दाखल होण्याआधी 6 लाख 77 हजार 133 प्रवाशांचे स्क्रिनिंग केल्याने ही संसर्गाला वेळीच रोखण्यात यश येत आहे. मनपाने तयार केलेले 'माझे आरोग्य माझ्या हाती' हे ॲप तर देशभरात अनुकरणीय ठरले.त्याचप्रमाणे व्यापारी, छोटे दुकानदार, व्यावसायिक यांच्या संपर्कात अधिक संख्येने लोक येतात. त्यांच्याव्दारे संसर्गाचा धोका जास्त प्रमाणात आहे, हे लक्षात घेऊन मनपाने या घटकातील लोकांची ॲन्टीजन चाचणी औरंगाबादमध्ये सूरू केली, असे करणारे औरंगाबाद देशात प्रथम ठरले.
मनपातर्फे राबवण्यात येत असलेला ' डॉक्टर आपल्या दारी ' हा उपक्रम ही उपयुक्त ठरत आहे. भारतीय जैन संघटनेच्या दोन ऍ़म्बुलन्सेस व एनयुएचएम अंतर्गत एक ऍ़म्बुलन्स याद्वारे स्लममधून साधारणत: 21 हजार 359 एवढया नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात आली. त्यापैकी 2134 पोलीस कर्मचाऱ्यांचे स्क्रिनिंग करण्यात आले. वेळोवेळी विविध सेवाभावी संस्थांची (NGO) वेगवेगळया स्वरुपात (मनुष्यबळ, पीपीई किटस, सॅनिटायझर्स, हॅण्डग्लोज, मास्क, शेड उभारणे इ.) मदत मिळाली. मनपाच्या वतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टास्क फोर्स टिम तयार करण्यात आली असून त्या माध्यमातून उत्तम काम होत आहे. सध्या मनपाच्या पोर्टलवर औरंगाबाद जिल्हयाचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेश्मे 8.21 आहे. तसेच 1000 मोबाईल फिव्हर क्लिनीक्स मधून ILI सारखी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना मनपा आरोग्य केंद्रात संदर्भित केले. तातडीने नागरिकांना आवश्यक उपचार सुविधा देण्यासाठी यंत्रणा विविध उपक्रम राबवित आहेत. संसर्गाच्या वाढत्या धोक्याला लक्षात घेऊन खासगी रूग्णालयांनाही कोरोना रूग्णांना उपचार करणे अनिवार्य केले आहे. जिल्ह्यातील 24 खासगी रूग्णालयांमध्ये रूग्णांवर उपचार केले जात असून त्यांना शासन दराने उपचार करणे बंधनकारक आहे.तसेच त्यांच्या देयक तपासणीसाठी लेखापरिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गतही कोरोना उपचार अंतर्भुत केले असून सर्व कोरोना रूग्णांना त्याअंतर्गत 20 ते 85 हजार रुपयांची सवलत देण्यात येत आहे. या सर्व उपचार सुविधांसह कोरोना रुग्णांना उपयुक्त ठरणारी प्लाझ्मा थेरपी घाटीत सुरू करण्यासाठीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे. तसेच सिरो सर्वैक्षणातूनही योग्य उपचारासाठी सहायक ठरेल. ग्रामिण भागात संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी जनतेने स्वयंशिस्तीतून प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे.
उद्योग चक्र अविरत आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासोबतच जिल्ह्याचे अर्थचक्र, उद्योग क्षेत्र सुरळीत ठेवण्यात या संकट काळातही आपण यशस्वी ठरलो. त्यामुळेच जिल्ह्यात लॉकडाऊन काळातही अत्यावश्यक सेवा पूरवणा-या उद्योजकांसाठी कमीत कमी मनुष्यबळ वापर करण्याच्या अटीस अधीन राहून औद्योगिक क्षेत्रातील आणि बाहेरील उदयोजकांना पहिल्या टप्पयात 540 उदयोजकांना तर दुस-या टप्प्यात 5 हजार 536 उदयोजकांना परवानगी देण्यात आली. यात औषधी उत्पादन, खाद्यपुरवठा, खाद्य प्रक्रिया व इतर पुरक उदयोगांचा समावेश आहे. आज घडीला एकूण 5 हजार 546 उद्योग सुरू आहेत. या उदयोगात 1 लाख 69 हजार 263 एवढे मनुष्यबळ काम करत आहे. लॉकडाऊन काळातही इतक्या संख्येन उद्योग सुरू ठेवत आपण जिल्ह्याचे उद्योगचक्र सुरू राहण्याची खबरदारी घेतली.
शिवभोजनाव्दारे गरजूंना जेवण उपलब्धविषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करणे अनिवार्य होते. पण या काळात जनसामान्य, कष्टकरी जनतेच्या पाठीशी शासन पूर्णपणे आहे. या काळात गरजूंना अल्प दरात व्यवस्थित जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात या शासनाने सुरू केलेल्या शिवभोजन उपक्रमाची भूमिका निश्चितच खुप मोलाची ठरली. जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात 332313 जणांना शिवभोजनाव्दारे जेवण उपलब्ध करून देण्यात आले. शिधापत्रिका धारकांना रास्तभाव दुकानांच्या माध्यमातून जिल्ह्यात सुरळीतपणे धान्य वाटप करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात विविध सामाजिक स्वयंसेवी संस्था आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातुन लॉकडाऊनमध्ये 1,21,700 कुटुंबांना मोफत किराणा किटचे वितरण करण्यात आलेले आहे. तसेच 15,74,944 गरीब व गरजूंना मोफत भोजन व फुड पॅकेट्स देण्यात आले आहेत.
मोफत धान्य वितरण एप्रिल 2020 ते जुलै, 2020 मध्ये प्राधान्य कुटुंब योजनेच्या 20,02,819 लाभार्थ्यांना 2,23,290 क्विंटल गहू व 1,48,800 क्विंटल तांदूळ , अंत्योदय अन्न योजनेच्या 2,89,350 लाभार्थ्यांना 57,680 क्विंटल गहू व 30,110 क्विंटल तांदूळ वितरीत केला आहे. APL शेतकरी योजनेच्या 3,96,673 लाभार्थ्यांना 42,360 क्विंटल गहू व 28,220 क्विंटल तांदूळ वितरीत , प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे एप्रिल 2020 ते, जुलै, 2020 मध्ये 3,87,030 क्विंटल तांदूळ व 65,280 क्विंटल गहू , 5700 क्विंटल तुरदाळ व 8547 क्विंटल चनादाळ मोफत वितरीत करण्यात आलेली आहे. तसेच माहे मे व जून महिन्यामध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत उपरोक्त नियमित लाभार्थ्यांप्रमाणेच केशरी कार्डधारकांनाही सवलतीलच्या दराने धान्य वितरीत करण्यात आलेले आहे. यामध्ये 6,30,667 लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती 03 किलो गहू व 02 किलो तांदूळ अनुक्रमे 08 रु व 12 रु. या दराने वितरीत तर आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत 1,16,761 विनाकार्डधारक लाभार्थ्यांना मोफत तांदुळ व अख्खा चना वितरीत करण्यात येत आहे. कोरोना संकटाने जगाचा इतिहासच बदलवून टाकला. महाराष्ट्राने या कठीण काळात प्रामुख्याने शेतकरी, कष्टकरी वर्गाला, सर्व नागरिकांना सुरक्षीत ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिगच्या नियमांचे पालन करत शेती, रोजगार, शिक्षण, यासह इतर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करण्याला प्राधान्य दिले.
शेतकऱ्यांना दिलासाजिल्ह्यात कृषी विभागाने आरोग्य आपत्तीच्या काळातही उत्कृष्ट काम करून दाखवले. शेतकरी आपला पोशींदा आहे, आरोग्य आपत्तीत अन्नधान्य लागणार आहे. तसेच एप्रिल मे मध्ये तयार झालेले धान्य, भाजीपाला नागरिकांपर्यंत पोहचवण्यासाठी थेट शेतातून ग्राहकांच्या दारात भाजीपाला पोहचवण्याचा उपक्रम शेतकरी आणि ग्राहक दोघांनाही उपयुक्त ठरला. जिल्ह्यात 29 मार्च 2020 रोजी सुरू केलेला हा उपक्रम आज तयागत सुरू असून आता पर्यंत या उपक्रमात 10 कोटी 69 लाख रक्कमेची उलाढाल झालेली आहे.
पीकविमासन 2020-21 मध्ये आतापर्यंत 6.57 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सन 2020-21 मध्ये खरीप हंगामात 31 जुलै 2020 अखेर 7.98 लाख विमा प्रस्ताव प्राप्त झाले असून 3.40 लाख हेक्टर क्षेत्राचा पीक विमा शेतकऱ्यांनी काढला आहे.तसेच बँकामार्फत विमा भरलेल्या शेतकऱ्यांची विमा ऑनलाईन भरण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2020 असल्याने यामध्ये वाढ होणार आहे. सन 2019-20 खरीप हंगाममध्ये औरंगाबाद जिल्ह्यात 4047 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा शेतकऱ्यांनी विमा उतरविला होता. 358.39 कोटी रू. नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प राबविण्यामध्ये औरंगाबाद जिल्हा सुरवातीपासून राज्यात प्रथम क्रमांकावर राहीला आहे. जागतीक बँकेचा हा प्रकल्प असुन विविध घटकावर आज पर्यंत 117 कोटी निधी 26 हजार 713 लाभार्थींच्या बँक खात्यात अनुदान स्वरूपात जमा करण्यात आला आहे. मागेल त्याला शेततळे या अभियानंतर्गत जिल्ह्यास 9100 लक्षांक असुन 14 हजार 263 कामे पुर्ण झाली आहेत. आतापर्यंत 13 हजार 320 शेततळ्यांना रूपये 64 कोटी 34 लाख अनुदान वाटप करण्यात आले आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेमध्ये औरंगाबाद जिल्हा राज्यामध्ये व्दितीय क्रमांकावर आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान 2019-20 अंतर्गत शेततळे, कांदाचाळ, सामुहीक शेततळे, संरक्षीत शेती, शेततळे अस्तरीकरण इत्यादी साठी रूपये 50 कोटी 59 लाख अनुदान वितरीत करण्यात आले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सन 2019-20 मध्ये ठिबक व तुषार सिंचन संच बसविणाऱ्या 9369 शेतकऱ्यांना 30 कोटी 90 लाख रूपये रक्कमेचे अनुदान देण्यात आले असुन यामुळे कमी पाण्यात जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यात मदत झाली आहे.
कापूस खरेदीचे आव्हान यशस्वीपावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे एक मोठे आव्हाण आपल्या समोर होते. त्यातही मा. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्याने दहा वर्षातील विक्रमी कापूस खरेदी वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. जिल्ह्यातही या कोरोना आपत्तीत कमी मनुष्यबळात विहीत मुदतीत कापूस खरेदी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली असून जिल्ह्यात हंगाम 2019-2020 मध्ये कापुस खरेदी कोवीड पुर्वी ही 33 हजार 287 शेतकऱ्यांची 9 लाख 64 हजार 751 क्विंटल खरेदी झालेली आहे. कोवीड नंतर 8 हजार 561 शेतकऱ्यांची 2 लाख 75 हजार 524 क्विंटल खरेदी झालेली आहे. अशा प्रकारे कोविड पुर्वी व नंतर मिळुन एकुण 41 हजार 848 शेतकऱ्यांची 12 लाख 40 हजार 275 क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे. तसेच मुग, तुर, चना, मका याचीही मोठ्याप्रमाणात खरेदी होऊन शेतकऱ्यांना मोबदला अदा करण्यात आला आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती सन्मान योजना या अतंर्गत महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन 2020-21 मध्ये एकुण 1 लाख 65 हजार 876 सभासदांना रू. 1033 कोटी 21 लाख 22 हजार एवढ्या रकमेचे खरीप कर्ज वाटप करुन बँकांनी 86.33 टक्के एवढे उद्दिष्ट साध्य केले आहे. तसेच वरील कर्ज वितरणांपैकी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळालेला आहे व अद्याप लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांपैकी एकूण 58 हजार 826 शेतकऱ्यांना रु.206 कोटी 67 लाख 70 हजार एवढ्या रकमेचे खरीप 2020 साठी पीक कर्ज वितरीत केलेले आहे.
शिक्षण : लर्निंग फ्रॉम होम लर्निंग फ्राम होम अतंर्गत सुशिक्षित पालक व वरच्या वर्गातील विद्यार्थी यांच्या मदतीने शिक्षक गावातील घरातील विद्यार्थ्यांना स्वतः शिकवत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळा बंद असून ही शिक्षण सुरु आहे. यामध्ये 1053 शाळा सहभागी असून त्याद्वारे 1 लाख 14 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा पद्धतीने जिल्ह्यातील प्रत्येक घटकातील नागरिकांसाठी बालकांसाठी कष्टकरी, व्यापारी, कामगार यासह सर्व नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या सकंटकाळातही त्या दिशेने जिल्ह्यात उत्तम कामगिरी होत आहे. अडचणी येतात आणि जातात पण त्या अडचणीच्या काळात आपण सर्व एकीच्या भावनेतून देशसेवेच्या जाणीवेतून एकत्र आलो. ज्याप्रमाणे परकीय शक्तीच्या आक्रमणातून आपल्या देशबांधवांनी स्वातंत्र लढ्याची लढाई यशस्वी करत देशाला स्वातंत्र्य दिले. त्याच पद्धतीने आज आपल्याला कोरोना विषाणू पासून आपल्या बांधवांना, देशवासियांना सुरक्षित ठेवण्याचे आव्हाण पेलायचे आहे.
सर्व कोरोना योद्ध्यांच्या उत्कृष्ट कामाप्रती कृतज्ञता व्यक्त करून आपल्या सर्व नागरिकांच्या सहकार्याने सुदृढ, सक्षम जिल्हा बनवण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याची ग्वाही व्यक्त करतो. सहकार्य आणि समन्वयातून आपल्या सर्वांच्या सोबतीने सगळे मिळुन आत्मनिर्भर भारत बनवू या… जिल्ह्याला अधिक सक्षम, सदृढ बनवत यशस्वी वाटचाल करू या, अशा शुभेच्छा व्यक्त करुन पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या आणि आरोग्यदायी जीवनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो.
( शब्दांकन : वंदना थोरात, माहिती अधिकारी )