औरंगाबाद : मुकुंदवाडी, रामनगर येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये पैठण तालुक्यातील चांगतपुरी येथील तीन रुग्णांकडून कोरोना उपचारांसाठी अतिरिक्त रक्कम घेतल्याप्रकरणी शिवसेनेने डॉक्टरसह पूर्ण हॉस्पिटलला घेरले. अतिरिक्त बिलाचे १ लाख ३८ हजार रुपये परत करण्याचे आश्वासन डॉक्टरांनी दिल्यानंतर प्रकरण निवळले.
भगवान वढगणे, कांता घोरतळे, रवींद्र वढगणे, हे चांगतपुरी येथील शेतकरी तीन रुग्ण लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये कोरोना उपचार घेत आहेत. त्यांच्याकडून हॉस्पिटलने अतिरिक्त बिल आकारल्याची तक्रार रुग्ण नातेवाइकांनी आ. अंबादास दानवे यांच्याकडे केली. आ. दानवे यांनी हॉस्पिटलचे डॉ. राहुल शिरपेवार यांना फोन करून जास्तीचे बिल न घेण्याची विनंती केली; पण डॉक्टरांनी नकार देत उलटसुलट उत्तरे दिली. त्यामुळे आ. दानवे यांनी थेट हॉस्पिटल गाठले. दरम्यान, शिवसैनिकही हॉस्पिटलवर धडकले. डॉ. शिरपेवार यांचे दालन गाठून त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. जास्त बिल आकारले जात असल्याचे लक्षात आल्यावर त्यांना हा गैरप्रकार बेकायदेशीर आहे. गरीब रुग्णाची पिळवणूक या काळात करणे योग्य नाही. रुग्णांची रक्कम परत करा, अन्यथा आताच हॉस्पिटलची तक्रार करण्यात येईल. यावर डॉ. शिरपेवार यांनी अतिरिक्त रक्कम परत करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी माजी नगरसेवक मनोज गांगवे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, दामोदर शिंदे, मनोज बोरा, प्रशांत कुरहे, विष्णू गुंठाल, आदींची उपस्थित होते.
असे काही घडले नाही
याप्रकरणी डॉ. शिरपेवार यांनी सांगितले, अतिरिक्त बिल आकारले नाही. तसा कोणताही प्रकार हॉस्पिटलमध्ये घडला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.