छत्रपती संभाजीनगर : महाविद्यालयीन विद्यार्थी संकेत कुलकर्णीच्या अंगावर ५ ते ६ वेळा कार घालून चिरडून त्याचा निर्घृण खून केल्याच्या आरोपाखाली आरोपी संकेत जायभाय याला सत्र न्यायाधीश डी. एच. केळुसकर यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा आणि १२ हजार रुपये दंड ठोठावला. सहआरोपी संकेत मचे, विजय जोग आणि उमर पटेल यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.
२३ मार्च, २०१८ रोजी भर दुपारी संकेत कुलकर्णीची कामगार चौकामध्ये कारखाली चिरडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर संकेत जायभाय याने त्याच्या मैत्रिणीस मोबाइलवर मेसेज करून ‘संकेत कुलकर्णी आणि माझे भांडण झाले व मी सर्व काही संपविले,’ असा संदेश (मेसेज) पाठविला होता. घटनेनंतर तीन वेळेस तिला फोन करून, ‘संकेत कुलकर्णी तुला बोलत होता, त्यामुळे मी त्याच्या अंगावर कार घालून मारले,’ असे सांगितले होते. ही एका अर्थाने आरोपीने त्याच्या मैत्रिणीकडे संकेत कुलकर्णीला मारल्याची कबुली दिल्यासारखेच असल्याचा युक्तिवाद ॲड. उज्ज्वल निकम यांनी अंतिम सुनावणीच्या वेळी केला होता.
संकेत जायभाय याचा गुन्ह्याचा उद्देश सिद्ध करण्यासाठी ॲड. निकम यांनी आरोपीच्या मैत्रिणीच्या साक्षीवर भर दिला होता. त्यांनी जायभाय आणि त्याच्या मैत्रिणीच्या मोबाइलचे सीडीआर न्यायालयात दाखल केले होते. त्याच्या मैत्रिणीने या सर्व बाबी तिच्या साक्षीत सांगितल्या आहेत, त्यामुळे हा महत्त्वाचा पुरावा असून, घटनेतील इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी ही घटनाही अपघात नसून, संकेत जायभाय याने संकेत कुलकर्णीच्या अंगावर चार ते पाच वेळा कार घालून क्रूर पद्धतीने हत्या केल्याची साक्ष दिली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. आरोपीने मयत संकेत कुलकर्णी याला अनेक वेळा फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले असल्याचे मोबाइल सीडीआर त्यांनी न्यायालयात दाखल केले होते.
विनय वाघ यांनी प्रथम दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये उमर पटेल आणि संकेत मचे यांचा उल्लेख नव्हता. पुरवणी जबाबात त्यांना गोवण्यात आले. उमर आणि मचे यांचा संकेत कुलकर्णीशी वाद नव्हता. आरोपीने कार मागे घेतली तेव्हा गाडीच्या धडकेने मचे याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे उमर आणि मचे जायभायच्या गाडीत नव्हते. घटनेच्या पूर्वी किंवा नंतरही उमर आणि मचे हे जायभायच्या संपर्कात नव्हते. त्यामुळे त्यांचा संकेतला जीवे मारण्याचा कोणताही हेतू नसल्याचा युक्तिवाद ॲड. घाणेकर यांनी केला होता.
सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बाजू मांडली. जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे आणि ॲड. सिद्धार्थ वाघ यांनी त्यांना सहकार्य केले. संकेत मचे आणि उमर पटेलतर्फे ॲड. नीलेश घाणेकर आणि ॲड. मच्छिंद्र दळवी आणि विजय जोगतर्फे ॲड. भाले यांनी काम पाहिले.