औरंगाबाद : मित्र महम्मद हुसेन खान ऊर्फ आसेफ (३०, रा. रोजाबाग, हर्सूल) याच्या डोक्यात फरशी मारून त्याचा निर्घृण खून केल्याच्या गुन्ह्यात सत्र न्यायाधीश व्ही.बी. पारगावकर यांनी आरोपी फजल सिकंदर पटेल (३८, रा. हर्सूल) यास जन्मठेप व पाच हजार रुपये दंड ठोठावला. विशेष म्हणजे खटल्याच्या सुनावणीदरम्यान फितूर झालेली साक्षीदार आई आणि मुलावर खटला दाखल करण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत.
महम्मद हुसेन खान ऊर्फ आसेफ आणि त्याचे वडील युसूफ खान हुसेन खान रोजाबाग परिसरातील आदर्श नावाचे हॉटेल चालवीत होते. फजल व आसेफ मित्र होते. फजल आसेफला भेटण्यासाठी नेहमी हॉटेलवर येत होता. ६ एप्रिल २०१३ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास फजल हॉटेलवर आला. त्यामुळे आसेफचे वडील घरी गेले.
७ एप्रिल २०१३ रोजी पहाटे सव्वाचार वाजता युसूफ खान यांच्या ओळखीच्या गुलशनबी (रा. महेबूबनगर) व तिचा मुलगा जाकेर यांनी युसूफ खान यांना फोन करून त्यांच्या घरासमोर फजलने आसेफला मारहाण करून त्याच्या डोक्यात फरशीने वार करून गंभीर जखमी केले. त्याला एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याचे सांगितले. उपचार सुरू असताना आसेफचा मृत्यू झाला. याबाबत बेगमुपरा पोलीस ठाण्याचे तत्कालीन अंमलदार गणेश रामलाल बाखरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झाले फितूर
तपास अधिकारी तथा तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.आर. तेलुरे आणि श्रीपाद परोपकारी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बी.आर. लोया यांनी १८ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यातील ५ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांपैकी ४ फितूर झाले होते. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी फजल यास वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.
गुलशनबी आणि तिचा मुलगा जाकेर या दोन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी आणि विशेष न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदविले होते. असे असताना ते खटल्याच्या सुनावणीदरम्यान फितूर झाले. शपथेवर हेतुपुरस्पर खोटी साक्ष दिली म्हणून दोघांवर कारवाई करण्याची विनंती सहायक लोकअभियोक्ता बी.आर. लोया यांनी केली असता न्यायालयाने वरील दोघांनी खोटी साक्ष दिल्याबाबत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात खटला दाखल करण्याचे आदेश निबंधकांना दिले.
--------------------------------------------