औरंगाबाद : भावी पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळणारा लष्करातील लान्स नायक सचिन देवमण हनवतेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एच. एस. महाजन यांनी सोमवारी (दि.८ जुलै) जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.पदमपुरा येथील माधुरी प्रकाश जिनवाल (२२) सोबत पिसादेवी रोडवरील भक्तीनगर येथील सचिन देवमण हनवतेचे लग्न ठरले होते. १७ जून २०१२ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. या साखरपुड्यामध्येच १४ फेब्रुवारी २०१३ ही लग्नाची तारीख ठरली होती. लग्न असल्यामुळे पश्चिम बंगाल येथील सिलिगुडी येथे लष्करात लान्स नायक पदावर कार्यरत असलेला सचिन हनवते ५ फेबु्रवारी २०१३ रोजी सुटी घेऊन औरंगाबादला आला होता. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता त्याने भावी पत्नी माधुरीला मोबाईलवर कॉल करून पैठणी शालूवरील ब्लाऊजचे माप देण्यासाठी आणि चप्पल घेण्यासाठी स्वत:च्या बहिणीच्या घरी बोलावले. त्यामुळे माधुरी हडकोतील नवजीवन कॉलनीत गेली.माधुरी आणि सचिन या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे सचिनने माधुरीच्या अंगावर रॉकेल ओतून काडी लावली. यामध्ये ती गंभीररीत्या भाजली. तिला उपचारासाठी खाजगी दवाखान्यामध्ये दाखल के ले. तेथे तिचा जबाब नोंदविण्यात आला. उपचारादरम्यान २१ फेब्रुवारी २०१३ रोजी माधुरी मरण पावली होती. तिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून सिडको पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ अन्वये सचिनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता मधुकर आहेर यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यामध्ये फिर्यादी माधुरी, तिचे आई-वडील, नायब तहसीलदार आणि डॉक्टरांची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने सचिनला वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला.
भावी पत्नीला जिवंत जाळणाऱ्या लष्करी जवानाला जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 12:14 AM