छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या रेकॉर्ड रूममध्ये मागील ४० वर्षांपासून जुन्या संचिका अक्षरश: कोंबून ठेवल्या होत्या. कालबाह्य झालेल्या या संचिका जपून ठेवल्या होत्या. त्यामुळे नवीन संचिका ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती. महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी रेकॉर्ड रूम अद्ययावत करण्याचे काम हाती घेतले. आतापर्यंत १ लाख ७२ हजार संचिका रद्दीत टाकण्यात आल्या. एक वर्षानंतर ही रद्दीही नष्ट करण्यात येईल.
नगरपरिषदेच्या काळापासूनचे दस्तऐवज ठेवण्यासाठी महापालिका मुख्यालयात रेकॉर्ड रूम तयार केलेली आहे. जुने रेकॉर्ड मागण्यासाठी आजही असंख्य नागरिक दररोज येतात. चलन भरून महापालिका त्यांना झेरॉक्स प्रत देते. या रेकॉर्डला वाळवी लागू नये, उंदीर आत जाऊ नयेत याची काळजी घ्यावी लागते. औषधी फवारणी व अन्य बाबींवर लाखो रुपये खर्चही करावे लागत होते. मागील काही वर्षांपासून या हॉलमध्ये नवीन रेकॉर्ड ठेवण्यासाठी जागाच नाही. त्यामुळे अनेक विभागांमध्ये जुने रेकॉर्ड पडून आहे.
महापालिकेचे प्रशासक जी. श्रीकांत यांनी तीन महिन्यांपूर्वी रेकॉर्ड रूमची बारकाईने पाहणी केली. काही फाइलींचे गठ्ठे उघडून बघितले. त्यात वर्तमानपत्रांची कात्रणे, सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त, मंत्र्यांचे दौरे, भाड्याने दिलेल्या हॉलचे रजिस्टर असे कितीतरी बिनकामाचे रेकॉर्ड होते. हे सर्व रेकॉर्ड शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अ, ब, क आणि ड वर्गवारी करून निष्कासित करावे असे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार मागील दोन-अडीच महिन्यांपासून रेकॉर्डची वर्गवारी करण्यात येत आहे. विविध विभागांमध्ये काम करणारे कर्मचारी दररोज रेकॉर्डची तपासणी करून वर्गवारी करीत आहेत. आतापर्यंत १ लाख ७२ हजार फाइली रद्दीत टाकण्यात आल्या आहेत. नवीन रेकॉर्ड रूम अद्ययावत स्वरूपात तयार करण्यात येणार आहे.