औरंगाबाद : कौटुंबिक वादातून तरुणाने दारूच्या नशेत खोलीचे दार आतून बंद करून गळफास घेतला. पोलिसांनी दार तोडून आत जाऊन गळफासाचा दोर कापत त्याचे प्राण वाचविल्याची घटना रविवारी मध्यरात्री साडेबारा ते पाऊण वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील राजनगर येथे घडली. अरुण सोमनाथ सोनवणे (२७) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पोलिसांनी सांगितले की, अरुण मजुरी काम करतो. त्याला दारूचे व्यसन जडले आहे. तो रोज दारू पिऊन घरी जातो आणि कुटुंबातील नातेवाइकांना शिवीगाळ, मारहाण करतो. रविवारी रात्री दारूच्या नशेत तो वडिलांना शिवीगाळ करू लागला. यामुळे तुला पोलिसांत देतो, असे त्याला सांगून वडील पोलीस ठाण्यात जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. यानंतर मी आत्महत्या करतो, असे सांगून अरुणने स्वत:ला खोलीत कोंडून घेतले. ही बाब नातेवाइकांनी पोलिसांना फोन करून कळविली.
गस्तीवरील पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन पवार, होमगार्ड ओळेकर यांनी तात्काळ अरुणच्या घरी धाव घेतली. तेव्हा दरवाजा ठोठावूनही तो दार उघडत नव्हता. यावेळी पोलिसांनी तात्काळ दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा अरुणने दोर गळ्याला बांधून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसले. पोलिसांनी तातडीने दोर कापून त्याला खाली उतरविले. ताेपर्यंत पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर आणि कर्मचाऱ्यांनी तेथे धाव घेतली. अरुणला पोलिसांच्या वाहनांतून घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे यांनी सांगितले.