उस्मानाबाद : अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीस अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी़पीक़ुलकर्णी यांनी जन्मठेप व एक हजार रूपयांचा दंड ठोठावला़ ही घटना ५ जानेवारी २०१४ रोजी तेर (ता़उस्मानाबाद) येथे घडली होती़ याबाबत अतिरिक्त शासकीय अभियोक्ता दीपक पाटील-मेंढेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड येथील अनिता मदनसिंग ठाकूर यांची मुलगी नेहा उर्फ पूजा हिचा १९ आॅक्टोबर २०१२ रोजी तेर (ता़उस्मानाबाद) येथील निलेश लक्ष्मीकांत व्यास याच्याशी नांदेड येथे विवाह झाला होता़ विवाहनंतर ९ महिने नेहा हिस चांगल्या पद्धतीने नांदविण्यात आले़ मात्र, निलेश याचे एका महिलेशी अनैतिक संबंध जुळले आणि त्या अनैतिक संबंधाला त्याची पत्नी नेहा ही विरोध करू लागली़ त्यामुळे निलेश व्यास याने ५ जानेवारी २०१४ रोजी राहत्या घरात नेहा उर्फ पूजा हिचा गळा आवळून खून केल्याची फिर्याद अनिता ठाकूर यांनी ६ जानेवारी २०१४ रोजी दिली. ठाकूर यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुरनं ०२/१४ भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्याचा तपास झाल्यानंतर तपासाधिकाऱ्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़ या प्रकरणाची उस्मानाबाद येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी़पीक़ुलकर्णी यांच्या समोर सुनावणी झाली़ यावेळी समोर आलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड़ दीपक पाटील- मेंढेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने निलेश लक्ष्मीकांत व्यास याला पत्नी नेहा हिचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप व एक हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली़ दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा १८ डिसेंबर रोजी सुनावल्याची माहिती अॅड़ दीपक मेंढेकर यांनी दिली़ (प्रतिनिधी) या खून खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकारतर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले होते़ यात घटनास्थळाचे पंच, आरोपीचे नातेवाईक, जप्ती पंचांसह १७ जणांची तपासणी करण्यात आली़ अनेक साक्षीदार फितुर झाले होते़ मात्र, फिर्यादी अनिता ठाकूर व तपासाधिकारी यांची साक्ष या प्रकरणात महत्त्वपूर्ण ठरली़
पत्नीच्या खून प्रकरणी पतीस जन्मठेपेची शिक्षा
By admin | Published: December 19, 2015 11:20 PM