औरंगाबाद : कुत्र्यांचे सरासरी आयुर्मान २०१२ साली १२ वर्षे होते. पण वेगवेगळ्या ४०० प्रजातींंचे १८-१९ वर्षांचे श्वानही सध्या शहरात आहेत. योग्य निगा, वेळेवर लसीकरण, तज्ज्ञांची उपलब्धता, प्राणी पाळण्याबद्दलची जागृती, उपलब्ध अद्ययावत सोयीसुविधा, औषधोपचारामुळे हे शक्य झाल्याचे पशुचिकित्सक डाॅ. ए. आर. भादेकर यांनी लोकमतला सांगितले.
शहरात ४० वर्षांपूर्वी प्रॅक्टीस सुरू केली, तेव्हा मोजक्या जातींचे, चैनीपेक्षाही सोबती आणि राखणदार म्हणून कुत्रे पाळले जात होते. आता लहान मुलांशी खेळणारे, काम करून घेण्यासाठीच्या प्रकारातील सुमारे ४०० जातींचे कुत्रे, अनेक जातींच्या मांजरी पाळल्या जात आहेत. दहा हजार ते पाच सात लाखांपर्यंत किमतीचे श्वान शहरात आहेत. त्यात दिवसेंदिवस वाढ होत असताना कोरोना काळात वाढलेला एकटेपणा, रस्त्यावर दैना होत असलेल्या कुत्र्यांबाबतची भूतदया आणि लाईफ स्टेटस् म्हणून श्वान पाळणाऱ्यांची संख्या अचानक वाढली.
तशी सात ते आठ खाजगी पशुवैद्यकीय दवाखाने, कुत्र्यांसाठी लागणाऱ्या १५ ते २० खाद्य कंपन्यांची विक्री केंद्रे, प्राण्यांसाठी घरे, गाद्या, खेळणी, बॉल, पिंजरे, साखळ्या, बेल्ट विक्रीची दुकाने आहेतच; शिवाय ऑनलाईन विक्रीही मोठ्या प्रमाण वाढली आहे. तसेच चार ते पाच श्वानप्रेमींच्या संघटना वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. तसेच रस्त्यावरील कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या संघटनाही पुढे आल्या आहेत. माणसांत आता आलेला कोरोना कुत्र्यांमध्ये २० वर्षांपूर्वी आला. त्यावर पुढे लसीही निघाल्या; त्या नियमित दिल्या जातात, असे डाॅ. भादेकर म्हणाले.
श्वान पाळताना अशी घ्यावी काळजीदीड महिन्यानी पहिली लस, त्यानंतर २१ दिवसानी दुसरी लस, त्यानंतर २१ दिवसानी तिसरा डोस घ्यावा. पहिल्या १५ दिवसानी जंताचे औषध, ३ ते ६ महिने दर महिन्याला जंताचे औषध, तर सहा महिन्यांपुढे दर तीन महिन्यानी हे औषध द्यावे. दिवसातून चार वेळा स्वच्छ पाणी, पहिले सहा महिने ३ वेळेस तर सहा महिन्यांनी दिवसातून दोन वेळा स्वच्छ आहार द्यावा. असा सल्लाही त्यांनी दिला.
या जातींचे श्वान अधिकसॅबोरियन हस्की, सेंड बर्नार्ड, जर्मन शेफर्ड, पामेरियन, ल्हासा ॲप्सो, शीट झू, यॉर्कशायर टेरियर, लॅब्रेडाॅर, वायमरानर, ग्रेट डेन, डाबरमन, बीगल, पग इ.सह गावठी, देशी जातीचे श्वानही पाळले जातात. आता केवळ १ नव्हे तर पाच-सात प्रजातींचे कुत्रे, मांजरे पाळणाऱ्यांची संख्याही शहरात अधिक आहे. असे श्वानप्रेमी मंगेश वाघ म्हणाले.