लोकमत न्यूज नेटवर्ककडा : संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी आरणगावहून ज्योत आणण्याची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी तरूणांचा पुढाकार असतो. हीच परंपरा कायम ठेवत ते तिघे ज्योत घेऊन आनंदवाडीकडे निघाले होते. रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि दोघांची प्राण‘ज्योत’ मालवली. या घटनेने गाव सुन्न झाले आहे.गणेश जनार्दन बोडखे (२५) व अजित आप्पासाहेब बोडखे (२७) असे ठार झालेल्या तरूणांची नावे आहेत, तर अविनाश महादेव ननावरे हे गंभीर जखमी झाले आहेत. आष्टी तालुक्यातील आनंदवाडीमध्ये संत सावतामाळी यांच्या पुण्यतिथीनिमत्त अखंड हरिनाम सप्ताह असतो. सात दिवस कार्यक्रमांची रेलचेल असते. आनंदवाडीसह परिससरातील अनेक गावांतील नागरिक येथे येत असतात. त्यामुळे सात दिवस वातावरण भक्तिमय होते. शनिवारी या सप्ताहाची सांगता होती. दरम्यान, गावातील २० ते २५ तरूण प्रत्येक वर्षी आरणगावहून ज्योत घेऊन सांगताच्या दिवशी गावात पोहचतात. त्याप्रमाणे हे तरूण आनंदवाडीच्या दिशेने निघाले होते. २० ते २५ तरूण पायी चालत होते. तर सोबत असलेल्या दुचाकीवर गणेश, अजित व अविनाश बसलेले होते. रात्री दोनची वेळ होती. मुखी नामजप सुरू होता. याचवेळी समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच २३ एएन ७०७८) या तरूणांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.ही घटना चापडगाव (जि.अहमदनगर) यामध्ये गणेश व अजित जागीच ठार झाले. तर अविनाध ट्रकच्या धडकेने रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. यामुळे तो बचावला. त्याला सोबतच्या तरूणांनी तात्काळ कर्जतच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तोही सध्या मृत्यूशी झुंज देत आहे.
ज्योत आणणाऱ्या दोघांची प्राण‘ज्योत’ मालवली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:47 AM